Join us

पाणीपुरी, टिश्यू पेपर गणपतींची क्रेझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 2:41 AM

शहरात गणेशोत्सवाची धूम सुरू असून विविध गणेशोत्सव मंडळे आकर्षक मूर्ती आणि देखावे उभारून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

मुंबई : शहरात गणेशोत्सवाची धूम सुरू असून विविध गणेशोत्सव मंडळे आकर्षक मूर्ती आणि देखावे उभारून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पश्चिम उपनगरातील मालाड पश्चिमेकडील नर्सिंग लेन येथील पाणीपुरीच्या पुरीतून गणपती आणि अंधेरी पूर्वेकडील पारसी पंचायत रोड येथील अंधेरी ईश्वर या गणपतीची वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे.मालाड येथील श्याम निर्मल मित्र मंडळाने पाणीपुरी बनवण्याच्या साहित्यापासून नऊ फूट गणपतीची मूर्ती साकारली आहे. ३५०० पाणीपुरीचा वापर करून गणेशमूर्ती तयार करण्यात आली आहे. यात फक्त पाणीपुरीचा वापर न करता इतर साहित्यांचाही वापर करण्यात आला आहे. यात गणपती साकारण्यासाठी ३५०० पुऱ्या, ९ किलो मूगडाळ, २.५ किलो मटार, ४.५ किलो खजूर, २ किलो चणे, ३.५ किलो बटाटे, १ किलो चिंच, १ किलो बुंदी, अर्धा किलो मिरची आणि पुदिना या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. यासोबत गणपतीच्या सोंडेतून पाणी बाहेर पडतानाही दाखवण्यात आले आहे.अंधेरी येथील अंधेरी ईश्वर गणपती हा संपूर्ण टिश्यू पेपरपासून बनविण्यात आला आहे. या गणपतीची उंची २१ फूट आहे. कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती अनेक जण तयार करतात. परंतु टिश्यू पेपरपासून २१ फुटांची मूर्ती अजून कुठेही पाहायला मिळाली नाही. भलीमोठी मूर्ती ही विसर्जन केल्यावर अर्ध्या तासात ती विरघळून जाते. त्यामुळे या मूर्ती छिन्नविछिन्न स्थितीमध्ये आढळून येत नाहीत. पर्यावरणपूरक टिश्यू पेपरचा गणपती पाहून परिसरातील इतर मंडळांनीही टिश्यू पेपरचा गणपती बसविण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळात लहान मुलांसाठी स्पर्धा, ज्येष्ठ नागरिक योजना शिबिर अशा प्रकारे कार्यक्रम घेतले जातात, अशी माहिती तरुण मित्र मंडळाचे मुख्य सल्लागार नीलेश भोजने यांनी दिली.

टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सव