Join us  

प. रेल्वेवर आज जम्बो मेगाब्लॉक

By admin | Published: April 24, 2016 2:25 AM

वैतरणा खाडी पुलाचे गर्डर टाकण्याचे काम २४ एप्रिल रोजी हाती घेण्यात येत असल्याने पश्चिम रेल्वेने सफाळा-वैतरणा दरम्यान १० तासांचा जम्बो मेगा ब्लॉक हाती घेतला आहे.

वसई : वैतरणा खाडी पुलाचे गर्डर टाकण्याचे काम २४ एप्रिल रोजी हाती घेण्यात येत असल्याने पश्चिम रेल्वेने सफाळा-वैतरणा दरम्यान १० तासांचा जम्बो मेगा ब्लॉक हाती घेतला आहे. रविवारी असणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे लग्नसराई, परीक्षा व इतर कारणांनी मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना सकाळी लवकर निघून रात्री उशिराने यावे लागेल किंंवा वाहनाने प्रवासाची सोय करावी लागणार आहे.सफाळे-वैतरणा दरम्यानच्या पूल क्र.९२ च्या गर्डरचे काम हाती घेतल्याने २४ एप्रिल रोजी सकाळी सव्वासात वाजल्यापासून सायंकाळी सव्वासहा वाजेपर्यंत दोन्ही दिशेने धावणाऱ्या २९ गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत, तर अन्य २० गाड्यांचे मार्ग संपण्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. या खेरीज मुंबईहून येणाऱ्या सहा व मुंबईकडे जाणाऱ्या नऊ गाड्यांना तासभरापासून तीन तासांचा विलंब होणे अपेक्षित आहे.२४ एप्रिल रोजी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या १४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. चर्चगेटला पालघरहून सकाळी ७.५१ वाजता जाणारी ९३००४ ही लोकल, तसेच फ्लाइंग राणी या ब्लॉक अगोदर जाणाऱ्या शेवटच्या गाड्या असणार आहेत. पालघरहून रात्री ८.१७ वाजता डहाणू-दादर सेवा व त्यानंतरच्या सेवा नियमित वेळापत्रकानुसार धावणे अपेक्षित आहे. या दरम्यान अप आणि डाउन दिशेने धावणाऱ्या गुजरात एक्स्प्रेस, सौराष्ट्र एक्स्प्रेस, फिरोजपूर जनता या गाड्या उशिराने धावतील, असे पश्चिम रेल्वेने सूचित केले आहे.मुंबईहून डहाणूकडे जाणाऱ्या डाउन गाड्यांमध्ये पालघरला ६.४९ वाजता पोहोचणारी ९१५७ दादर-डहाणू मेमू ब्लॉक अगोदर शेवटची गाडी ठरणार आहे. सायंकाळी सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस व नंतर येणाऱ्या गाड्या वेळापत्रकानुसार धावतील. या मेगाब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्या विलंबाने धावण्याची शक्यता पश्चिम रेल्वेकडून वर्तविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)मुंबईहून डहाणूकडे जाणाऱ्या डाउन गाड्यांमध्ये पालघरला ६.४९ वाजता पोहोचणारी ९१५७ दादर-डहाणू मेमू ब्लॉक अगोदर शेवटची गाडी ठरणार आहे. सायंकाळी सौराष्ट्र जनता एक्सप्रेस व नंतर येणाऱ्या गाड्या वेळापत्रकानुसार धावतील.