Join us

प. रे.चे बारा कोटी रुपये वाया

By admin | Published: November 04, 2015 3:40 AM

वान्द्रे ते खार दरम्यान असणाऱ्या पाचव्या मार्गाच्या कामाला स्थानिकांनी केलेल्या विरोधामुळे हा मार्ग चांगलाच रखडला. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न पश्चिम रेल्वेकडून करण्यात

मुंबई : वान्द्रे ते खार दरम्यान असणाऱ्या पाचव्या मार्गाच्या कामाला स्थानिकांनी केलेल्या विरोधामुळे हा मार्ग चांगलाच रखडला. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न पश्चिम रेल्वेकडून करण्यात आल्यानंतरही आता वान्द्रे ते खार दरम्यान असलेला मार्ग दुसऱ्या मार्गाने नेण्याचा निर्णय झाला असून साधारपणे दोन वर्ष लागतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. मुंबई सेन्ट्रल ते बोरीवली या पाचव्या मार्गाचे काम काही वर्षापूर्वी एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) हाती घेण्यात आले. आणि यातील मुंबई सेंट्रल ते माहीम टप्पा १९९३ साली, तर २00२ साली सान्ताक्रुझ ते बोरीवली टप्पा पूर्ण करण्यात आला. पंरतु वांद्रे ते खार अशा दीड किलोमीटरच्या टप्प्यातील काम झोपडपट्टीवासियांच्या विरोधामुळे रखडले. येथे असणारी एक पाऊलवाट तोडण्याला स्थानिकांनी विरोध केला होता. यावर पाच महिन्यांपासून तोडगाही निघत नव्हता. हे काम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेने शासनाकडे सुरक्षेची मागणी केली होती. परंतु त्याकडे शासनाकडून दुर्लक्षच करण्यात आले. अखेर यावर पश्चिम रेल्वेकडूनच मार्ग काढण्यात आला आहे. वान्द्रे ते खार या पट्ट्यात पाचव्या मार्गाच्या कामासाठी बारा कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. परंतु त्यावर पाणी सोडत आता दुसरा मार्ग शोधण्यात आला आहे. वान्द्रे जवळ हार्बर मार्गही जात असून तेथून एक एलिव्हेटेड (उन्नत)पुलही जातो. हा पुल जुना झाला असून त्याऐवजी नविन पुल बांधण्यात येणार आहे. यासाठी प्रथम नविन पुल बांधून त्यानंतरच जुना पुल तोडण्यात येईल. या पुलाखालूनच पाचवा मार्ग काढण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेन्द्र कुमार यांनी दिली. साधारपणे दोन वर्ष लागणार आहेत. (प्रतिनिधी)