मुंबई : सद्यस्थितीत वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले असून, हे प्रदूषण कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन, शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी केले.अंधेरी(पूर्व) येथील महापालिकेच्या बाळासाहेब ठाकरे वेरावली मनपा मराठी शाळा संकुल येथे भारत स्काउट्स आणि गाइड्स उत्तर व दक्षिण मुंबई मनपा जिल्हा संस्थेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या वेळी महेश पालकर बोलत होते. ते म्हणाले की, महापालिकेत १९२५ मध्ये स्काउट व गाइड विभागाची स्थापना झाली. १९२५ ते आजतागायत हा विभाग समाजाच्या विकास चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. शील, आरोग्य, कौशल्य, सेवा या चार तत्त्वावर ही चळवळ उभी आहे. वृक्षारोपण करणे हीसुद्धा एक सेवा असून, मातीची धूप थांबून वातावरणातील गारवा टिकावा पर्यायाने पर्यावरणाचे जतन व्हावे, हा उद्देश वृक्षारोपण मोहिमेमागे आहे. तर उपप्रमुख लेखापाल राजेंद्र पवार म्हणाले की, वृक्षाचे जतन होणे ही काळाची गरज असून, या प्रकारच्या वृक्षारोपण मोहिमेतून पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे.
‘प्रदूषण कमी होण्यासाठी वृक्षारोपण करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:14 AM