- खलील गिरकरउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निकालामध्ये भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांना विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात सर्वात अधिक मताधिक्य मिळाले आहे. महाजन यांना लोकसभा मतदारसंघात १ लाख ३० हजार ५ मताधिक्य मिळाले आहे. तर या विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे ७३ हजार २२९ इतके मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे या मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार पराग अळवणी यांचे पक्षांतर्गत स्थान अधिक मजबूत झाले आहे.विलेपार्ले मतदारसंघात १ लाख ५८ हजार ९९४ मतदान झाले. त्यापैकी महाजन यांना १ लाख १२ हजार १०७ मते मिळाली आहेत तर प्रिया दत्त यांना अवघ्या ३८ हजार ८७८ मतांवर समाधान मानावे लागले आहे. एकूण मताधिक्याच्या ५६ टक्के मताधिक्य महाजन यांना मिळवून देण्यात अळवणी यांना यश आले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतदेखील महाजन यांना विलेपार्ले मतदारसंघात सर्वात अधिक मताधिक्य मिळाले होते. २०१४ मध्ये एकूण मतदान १ लाख ५१ हजार ९८० झाले होते. त्यापैकी महाजन यांना १ लाख १० हजार २०१ मते मिळाली होती तर दत्त यांना ३१ हजार २५४ मते मिळाली होती.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महाजन यांना १ लाख ८६ हजार ७७१ मताधिक्य मिळाले होते, हे मताधिक्य या वेळी ५६ हजार ७६६ ने घटले आहे व १ लाख ३० हजार ५ वर आले आहे. विलेपार्लेमध्ये महाजन यांना २०१४ मध्ये ७८ हजार ९४७ मताधिक्य मिळाले होते. २०१९ मध्ये ७३ हजार २२९ मताधिक्य मिळाले आहे. गतवेळच्या तुलनेत ५ हजार ७१८ ने मताधिक्य घटले आहे. मात्र, तरीही एकूण मताधिक्यामध्ये सर्वात मोठा हिस्सा विलेपार्ले मतदारसंघाचा असल्याने अळवणी यांचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे व भाजपचे पराग अळवणी यांच्यात लढत झाली होती व भाजपने काँग्रेसकडून हा मतदारसंघ हिरावून घेतला होता. त्या वेळी शिवसेनेच्या शशिकांत पाटकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती तर हेगडे तिसºया क्रमाकांवर फेकले गेले होते. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये हेगडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या भाजप व शिवसेनेची युती झालेली असल्याने हा मतदारसंघ भाजपकडेच राहणार आहे.>विधानसभेवर काय परिणामया विधानसभेच्या मतदारसंघात भाजपने आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत भाजपला नक्कीच मिळेल.काँग्रेस पक्षाची कामगिरी या मतदारसंघात भाजपच्या तुलनेत अत्यंत वाईट झाली आहे. काँग्रेसकडून या मतदारसंघात लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांचा शोध घेण्याची वेळ पक्षावर आली आहे.विधानसभेची लढत एकतर्फी होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तवली आहे.
विलेपार्लेतील सर्वाधिक मताधिक्यामुळे पराग अळवणी यांचे स्थान मजबूत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 2:44 AM