Join us

परळ बसस्थानक सर्वाधिक स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 9:03 AM

Mumbai: राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) राबविण्यात येत असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा सहामाही निकाल जाहीर झाला असून त्यात मुंबई विभागातील सहा बस स्थानकांपैकी उरणवगळता इतर स्थानकांना चांगले गुण मिळाले आहे.

मुंबई - राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) राबविण्यात येत असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा सहामाही निकाल जाहीर झाला असून त्यात मुंबई विभागातील सहा बस स्थानकांपैकी उरणवगळता इतर स्थानकांना चांगले गुण मिळाले आहे. तर परळ बसस्थानक (६० गुण) सर्वात स्वच्छ स्थानक ठरले आहे. इतर स्थानकांत कुर्ला (५७), पनवेल (५७), दादर (५६) आणि मुंबई सेंट्रल (५२) यांचा समावेश आहे.

अ वर्गात ८० गुण प्राप्त करून जळगाव विभागातील चोपडा बसस्थानक प्रथम क्रमांकावर आहे. ब वर्गात कोल्हापूर विभागातील चंदगड व भंडारा विभागातील साकोली ही दोन्ही बसस्थानके ८३ गुण मिळवून प्रथम क्रमांकावर आहेत, तर क वर्गात सातारा जिल्ह्यातील मेढा बस स्थानक हे ८५ गुण मिळवून प्रथम क्रमांकावर आहेत. अभियानाचे ६ महिने पूर्ण झाले असून उर्वरित ६ महिन्यांमध्ये होणाऱ्या सर्वेक्षणातून सरासरी गुणद्वारे अंतिम निकाल जाहीर होणार आहे.

असे आहेत गुण       बसस्थानक स्वच्छता व सुशोभीकरणाला ३५ गुण      प्रसाधनगृह स्वच्छतेला १५ गुण     बसच्या स्वच्छतेला २५ गुण      प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांना २५ गुण

५० पेक्षा जास्त गुण आवश्यक स्वच्छता अभियानात एकूण गुणापैकी ५० पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारी बस स्थानके ही चांगल्या दर्जाची अथवा स्वच्छता अभियानामध्ये प्रगतिशील बसस्थानक म्हणून ओळखली जातात. तर ५० पेक्षा कमी गुण मिळालेल्या बस स्थानकांची स्वच्छता ही असमाधानकारक असल्याचे शेरे संबंधित समितीने ओढले आहेत.

स्वच्छता अभियान अंतर्गत सर्वेक्षण झालेल्या राज्यातील ५६३ बस स्थानकांपैकी २१२ बसस्थानके ही ५० पेक्षा कमी गुण मिळवून असमाधानकारक स्वच्छतेमध्ये समाविष्ट झाली असून ३५१ बस स्थानकेही ५० पेक्षा जास्त गुण मिळवून चांगली स्वच्छता राखण्यामध्ये यशस्वी झाली आहेत. राज्यातील ३१ विभागांपैकी मराठवाड्यातील जालना, विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती व पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागांत सर्वच्या सर्व बसस्थानके ही चांगले गुण प्राप्त करून स्वच्छतेच्या मार्गावर आहेत.कोकण विभागातील ८७ पैकी ५२ बस स्थानके ही असमाधानकारक स्वच्छता गटात समाविष्ट असून मराठवाड्यातील ११७ पैकी ५५ बस स्थानके असमाधानकारक स्वच्छतेमध्ये गणली गेली आहेत. 

टॅग्स :मुंबई