Join us

परळ, हिंदमाता यंदा कोरडेठाक; पावसाचे पाणी साठविण्यासाठी आणखी दोन टाक्यांची सोय

By मनोहर कुंभेजकर | Published: May 09, 2023 11:23 AM

दादर, परळ येथील हिंदमाता परिसरात दरवर्षी पावसाळ्यात  पाणी तुंबते, त्यामुळे येथील जनजीवनही विस्कळीत होते.

मनोहर कुंभेजकर 

मुंबई : दादर, परळ येथील हिंदमाता परिसरात दरवर्षी पावसाळ्यात  पाणी तुंबते, त्यामुळे येथील जनजीवनही विस्कळीत होते. यंदा मात्र अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पालिकेने भूमिगत टाक्या बांधल्या आहेत. या भूमिगत टाक्यांमध्ये पावसाचे पाणी साठवले जाते. या टाक्यांमध्ये आणखी दोन टाक्यांची भर पडली आहे,  त्यामुळे पाणी साचवून ठेवण्यासाठी नवीन पर्याय मिळाल्याने पाणी तुंबण्याची चिंता मिटणार आहे.

पैकीच्या पैकी! मजुराच्या मुलीने 12वीत मिळवले 600 पैकी 600 गुण; दररोज करायची 8 तास अभ्यास

मुंबईची भौगोलिक परिस्थिती ही बशीच्या आकारासारखी असल्याने पावसाळ्यात भरतीच्या वेळी दादर, परळ, हिंदमाता या ठिकाणी  पाणी तुंबते. या साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास विलंब लागत असल्यामुळे पूरस्थिती निर्माण होते. तसेच, येथील जनजीवनही विस्कळीत होते. दादर, हिंदमाता या परिसरात अनेक रुग्णालये आहेत. या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नागरिकांना पूरसदृश परिस्थितीमुळे अतोनात त्रास सहन करावा लागतो. 

प्रमोद महाजन कला उद्यान आणि सेंट झेवियर्स उद्यान

पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत काम करण्यात आले असून एफ/दक्षिण येथील परळ परिसरात सेंट झेवियर्स मैदानाखाली व जी /उत्तर येथील दादर परिसरातील प्रमोद महाजन कला उद्यानाखाली, हिंदमाता उड्डाणपुलाखाली व खाशाबा जाधव मार्ग येथे उदंनचन व्यवस्था उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात हा परिसर जलमय होणार नाही.पालिकेने सेंट झेवियर्स मैदानाखाली १.०५ कोटी लिटर क्षमतेची आणी प्रमोद महाजन कलापार्क येथे १.६२ कोटी लिटर क्षमतेचा साठवण टाक्यांचे पहिल्या टप्प्यातील काम २०२१ मध्ये पूर्ण केले आहे. 

दुसऱ्या टप्प्यातील सेंट झेवियर्स मैदानाखालील १.८१ कोटी लीटर क्षमतेच्या टाकीचे काम होण्याच्या मार्गावर असून टाकीचा उपयोग यंदा करणे शक्य होईल.