लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्थानक विकास योजनेंतर्गत रविवारी परळ, विक्रोळी आणि कांजूरमार्ग या तीन स्थानकांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. काही स्थानकांच्या कामाच्या निविदा दिल्या असून, कामाला सुरुवातही झाली आहे. त्यांची बहुतांश कामे फेब्रुवारीपर्यंत होतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी दिली. या योजनेंतर्गत मध्य रेल्वेवरील ३८ स्थानकांचा समावेश असून त्यासाठी १६९६ कोटी रुपये खर्च येणार आहे.
‘गरीब व श्रीमंतांना प्रगतीची समान संधी देणारे प्रवासाचे साधन’भारतीय रेल्वे हे गरीब आणि श्रीमंत या दोन्ही वर्गांना विकास आणि प्रगतीची समान संधी देणारे प्रवासाचे साधन आहे. रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे शहरी आणि ग्रामीण भागात आर्थिक संपन्नता निर्माण होईल व विकास सर्वसमावेशक होईल. आता रेल्वे सेवांमध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले असून रेल्वे प्रवास अधिक सुखकर झाला आहे. आपणही विमानापेक्षा शक्यतो रेल्वे प्रवासाला पसंती देतो, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केले.
मान्यवरांची उपस्थितीरेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा राष्ट्रव्यापी प्रकल्प हाती घेऊन केंद्र शासनाने सामान्य माणसाच्या स्वागतासाठी एकप्रकारे लाल गालिचा अंथरला आहे असे सांगून राज्यातील स्थानकांच्या विकासासाठी केंद्राने १६०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. कार्यक्रमाला कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर, ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री रमेश पतंगे, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अनंत लक्ष्मण गुरव उपस्थित होते.
प्रामुख्याने आवश्यक असल्यास अतिरिक्त पादचारी पूल, लिफ्ट आणि एस्कलेटर, प्रतीक्षालय आणि स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा, स्टेशन दर्शनी भागात सुधारणा आदी कामे केली जाणार आहेत. स्थानकांवर प्रकाश व्यवस्था सुधारणे, विविध चिन्हे, ट्रेन इंडिकेटर बोर्ड आणि कोच इंडिकेशन बोर्ड लावले जाणार आहेत. उद्यान असणार आहे. वन स्टेशन वन प्रॉडक्ट इतर स्थानकात सुरू केले जाणार आहे.