समांतर अभिनयाचा बोलका ‘प्रयोग’!
By admin | Published: December 26, 2016 05:54 AM2016-12-26T05:54:41+5:302016-12-26T05:54:41+5:30
प्रयोगशील म्हणवल्या जाणाऱ्या मराठी रंगभूमीवर सतत वेगवेगळे ‘प्रयोग’ होताना दिसतात. असाच एक अनोखा प्रयोग ‘कानांची घडी तोंडावर बोट’ या नाटकात घडवून
प्रयोगशील म्हणवल्या जाणाऱ्या मराठी रंगभूमीवर सतत वेगवेगळे ‘प्रयोग’ होताना दिसतात. असाच एक अनोखा प्रयोग ‘कानांची घडी तोंडावर बोट’ या नाटकात घडवून आणलेला दिसतो. या नाटकाच्या संहितेतच आकाराला आलेला हा प्रयोग जेव्हा रंगभूमीवर साकार होतो; तेव्हा कानांची घातलेली घडी उघडते आणि बोट कधी तोंडात जाते ते समजत नाही. अभिनयाचा समांतर आविष्कार काय असू शकतो आणि बोलकेपणाततून तो काय चमत्कार घडवू शकतो, हे या नाटकाने दाखवून दिले आहे.
प्रिया, जया आणि स्वाती या तीन मूक व कर्णबधिर मैत्रिणी एकत्र राहात आहेत. या तिघींचा भूतकाळ वेगवेगळा असला, तरी त्या एका धाग्याने बांधल्या गेल्या आहेत. या तिघींचे स्वत:चे असे एक विश्व आहे आणि या विश्वात बाहेरच्या माणसांची लुडबुड त्यांना नकोशी वाटते. या मैत्रिणींनी जगण्याचे काही नियम आखून घेतले आहेत. मात्र एका क्षणी यातली एक जण या नियमाचे उल्लंघन करते आणि नाटकाला वेगळे वळण मिळते. त्यांच्या या विश्वात मधूनच हवालदार, वॉचमन आणि कछवाभाई अशा व्यक्ती टपकत राहतात. हे कमी म्हणून की काय, एका विसरभोळ्या आजोबांची त्यांच्या आयुष्यात सारखी ‘एन्ट्री’ होत राहते.
लेखक संकेत तांडेल याने ही संहिता लिहिताना केलेला साधकबाधक विचार नाटकात स्पष्ट दिसतो. मूक आणि कर्णबधिर व्यक्तींच्या आयुष्यावर आधारित काही नाट्यकृती आतापर्यंत रंगभूमीवर येऊन गेल्या असल्या, तरी या नाटकाने मात्र त्यातली पात्रे उभी करताना वेगळा बाज स्वीकारला आहे. याचे श्रेय अर्थातच लेखकाचे आहे. परंतु त्याचबरोबर काही वेळा यातले नाट्य उगाचच भरकटल्यासारखे वाटते. पण वेगळ्या धाटणीची ही संहिता रंगभूमीवर उभी करताना दिग्दर्शक प्रसाद खांडेकर याने तिला दिलेली ट्रीटमेंट मात्र हटके आहे. या संहितेत मांडलेली संकल्पना जशीच्या तशी साकार करणे हे तसे अवघड काम होते; मात्र दिग्दर्शकाने ते लीलया पेलले असल्याचे या प्रयोगात स्पष्ट होत जाते. नाटकाच्या सुरुवातीला येणाऱ्या राष्ट्रगीताची कल्पनाही दाद देण्याजोगी आहे.
अभिनयात दिसणारी कल्पकता हे या नाटकाचे वैशिष्ट्य आहे. तीन मुख्य पात्रे आणि त्यांच्या अंतर्मनाचा खेळ रंगवणारी अजून तीन समांतर पात्रे यांची सांकेतिक भाषेतली लाजवाब केमिस्ट्री या नाटकात दिसते. हा सगळा खेळ रंगवणाऱ्या पूजा रायबागी, नम्रता सावंत, नेहा पाटील, वृषाली खाडिलकर, पूर्वा कौशिक आणि आसावरी नाईक या ‘मिळून सहा जणी’ त्यासाठी निश्चितच कौतुकास पात्र आहेत. त्यांनी नाटकात जी काही कामगिरी केली आहे, ती प्रत्यक्षात अनुभवण्यासारखी आहे. या सहा जणींचे जुळलेले टायमिंग आणि त्यांनी एकमेकांना दिलेली साथ वाखाणण्याजोगी आहे.
हवालदार, वॉचमन आणि कछवाभाई अशा तिहेरी भूमिकेत संदीप गायकवाड याने त्याच्या हक्काचे हशे वसूल करून घेतले आहेत. प्रसाद खांडेकर याचा आजोबा मजेशीर आहे आणि प्रसादने तो त्याच्या खास स्टाईलने रंगवला आहे. दिग्दर्शक या नात्याने प्रसादने स्वत:सह संदीपवरही बऱ्यापैकी अंकुश ठेवल्याने या दोघांची ‘बुलेट ट्रेन’ उगाच सुसाट धावत नाही, हेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे नाटकातल्या मुख्य सहा जणींवर असलेला फोकस अधिक प्रखर झाला आहे. सेल्समनच्या छोट्याशा भूमिकेत संकेत तांडेल छाप पाडतो. योगेश केळकर (प्रकाशयोजना), सी. जयेश (नेपथ्य) व सुशील कांबळे (संगीत) यांची या प्रयोगातली कामगिरी नाटकाला पूरक आहे. ‘श्री दत्तविजय प्रॉडक्शन’ने या नाटकाद्वारे मनोरंजनाचे वेगळे दालन उघडून दिले असून, अनोख्या संकल्पनेचा आविष्कार रंगभूमीवर सादर केला आहे.
तिसरी घंटा - राज चिंचणकर