‘त्या’ २१ काेटींच्या युरेनियम प्रकरणाचा एनआयएकडून समांतर तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:06 AM2021-05-08T04:06:28+5:302021-05-08T04:06:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एटीएसने जप्त केलेल्या ७ किलो युरेनियमप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही (एनआयए) समांतर तपास सुरू केला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एटीएसने जप्त केलेल्या ७ किलो युरेनियमप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही (एनआयए) समांतर तपास सुरू केला आहे. शुक्रवारी एटीएसकडून यासंबंधीची माहिती घेण्यात आली, तर दुसरीकडे जप्त केलेल्या २१ काेटींच्या युरेनियममागे अन्य काही हेतू होता का? याबाबत एटीएस अधिक तपास करत आहे.
फेब्रुवारी महिन्यातच एटीएसला (दहशतवाद विराेधी पथक) याबाबत माहिती मिळाली हाेती. मात्र, दोघांवर कारवाई करण्यापूर्वी ते खरेच युरेनियम आहे का? याची तपासणी होणे गरजेचे होते. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी गुजरातमधील व्यापारी असल्याचा बनाव करत आरोपींशी संपर्क साधत कारवाई केली. त्यांच्याकडून युरेनियमचे सॅम्पल मिळताच ते भाभा अणुसंशाेधन केंद्रात (बीएआरसी) पाठविण्यात आले. दोन महिन्यांनी त्याचा अहवाल मिळताच एटीएसने दोघांना अटक केली.
अटक आरोपी जिगर पंड्या आणि अबू ताहीर अफसल हुसैन चौधरी दोघेही उच्चशिक्षित असून, त्यांनी एमबीए केले आहे. दोघेही कॉलेजमध्ये असल्यापासून एकमेकांना ओळखतात. ताहीर इम्पोर्ट आणि एक्स्पोर्टचे काम पाहत हाेता. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीत ताहीरच्या वडिलांचा गोवंडी परिसरात भंगाराचा व्यवसाय आहे. ५ ते ६ वर्षांपूर्वी त्यांच्या दुकानात एक ट्रक भरून भंगार आले होते. ज्यामध्ये त्यांना युरेनियम मिळाले होते. हा पदार्थ वेगळा असल्यामुळे त्यांनी तो सांभाळून कपाटात ठेवला होता. तो युरेनियम आहे, याबाबत ते अनभिज्ञ होते, अशीही माहिती समोर येत आहे. एटीएसने जप्त केलेले युरेनियम घातक असल्यामुळे एनआयएकडून याबाबत समांतर तपास सुरू आहे. त्यांनी शुक्रवारी एटीएसकडून याबाबतची माहिती घेतली.
लॅबचालकाची घेतली मदत
ताहीरने एटीएसला दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२१ मध्ये जेव्हा त्याने हा पदार्थ पाहिला, त्यावेळी त्यासंदर्भात माहीत करून घेण्यासाठी त्याने इंटरनेटवर सर्चिंग सुरू केले. त्यात काहीच न समजल्याने त्याने मित्र जिगरला माहिती दिली. तो आयटी कंपनीत कामाला होता. जिगरच्या ओळखीत असलेल्या एका लॅबचालकाला हाताशी धरून त्याने याची माहिती घेण्याचे काम सुरू केले. तपासणीनंतर त्यांना हा युरेनियम असल्याचे, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत २१ कोटी असल्याचे समजले आणि त्यांची झोपच उडाली. त्यांनी ग्राहकाचा शोध सुरू केल्याचे सांगितले. ................................