ठाकरे सरकारला धोरण अन् कृतीचाही लकवा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 12:07 AM2020-06-07T00:07:32+5:302020-06-07T00:08:12+5:30
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका
मुंबई : कोविड किंवा चक्रीवादळामुळे उभ्या झालेल्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठीची कुठलीही तातडी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला दिसत नाही. या सरकारला केवळ धोरण लकवा झाला नसून कृती लकवादेखील झालेला आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.
ठाकरे सरकारने चक्रीवादळग्रस्तांसाठी जाहीर केलेली शंभर कोटी रुपयांची मदत अत्यंत तोकडी आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषापेक्षाही जास्त मदत देण्याची आवश्यकता आहे. सांगली, कोल्हापूर, रायगड जिल्ह्यामधील पूरग्रस्तांसाठी आम्ही ६,८०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते, असे फडणवीस म्हणाले. चक्रीवादळग्रस्त ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला १० हजार रुपये तर शहरी भागात १५ हजार रुपयांची मदत तात्काळ द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. उद्योगपती राजीव बजाज यांनी लॉकडाऊनवरून केंद्र सरकारवर केलेल्या टीकेबाबत फडणवीस म्हणाले की, बजाज हे कोविड किंवा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ नाहीत. ते उद्योगपती आहेत. दुचाकी गाड्यांबाबत ते बोलले असते तर तो त्यांचा अधिकार ठरला असता.