मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात दाखल केली. पुरावे नष्ट करण्यापूर्वी अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट गैरवर्तनाबद्दल त्वरित, नि:पक्षपाती चौकशी करण्याची मागणी परमबीर सिंग यांनी याचिकेद्वारे केली.
परमबीर सिंग यांनी याआधी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले होते. दरम्यान, स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांचा अहवाल आणि त्याच्याशी संबंधित गृह विभागाची फाईल न्यायालयात सादर करण्याचे तसेच देशमुख यांच्या घरातील सीसीटीव्ही फूटेज स्वतंत्र तपास यंत्रणेला ताब्यात घेण्याचे निर्देशही द्यावेत, अशी मागणी सिंह यांनी याचिकेत केली आहे.
देशमुख यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांच्या घरी सचिन वाझे आणि संजय पाटील यांच्याबरोबर बैठक घेतली. त्या दोघांना दरमहा १०० कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. २४-२५ ऑगस्ट २०२० या कालावधीत रश्मी शुक्ला यांनी अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कारभाराची जाणीव पोलीस महासंचालकांना दिली होती, असे सिंह यांनी याचिकेत नमूद केले. या याचिकेत राज्य सरकार, केंद्र सरकार, सीबीआय व अनिल देशमुख यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
‘देशमुख, परमबीर सिंग, वाझे यांची संपत्ती जप्त करा’अनिल देशमुख यांच्याबरोबरच परमबीर सिंग व त्यांना सहकार्य करणाऱ्या अन्य पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करावी, अशी मागणी करणारी आणखी एक जनहित याचिका ॲड. घनश्याम उपाध्याय यांनी दाखल केली आहे. देशमुख यांच्यासह, परमबीर सिंग व सचिन वाझेची स्थावर मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.