Param Bir Singh: परमबीर सिंग यांच्या आरोपांप्रकरणी चौकशी आयोग; राज्य सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 03:21 AM2021-03-25T03:21:19+5:302021-03-25T03:21:47+5:30
देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी चौकशी आयोग नेमण्याचा निर्णय बुधवारी राज्य सरकारने घेतला आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हे चौकशी आयोगाचे अध्यक्ष असतील.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्याप्रकरणी बैठकीत चर्चा झाली. अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची किंवा त्यांचा राजीनामा घेण्याची गरज नसल्याचे मत बैठकीत सर्व मंत्र्यांनी व्यक्त केल्याचे समजते. तसेच या आरोपांत किती तथ्य आहे, याचीही सत्यता आयोगामार्फत तपासली जाणार आहे. ‘कमिशन ऑफ एन्क्वॉयरी ॲक्ट’अंतर्गत ही चौकशी होणार आहे.