परमबीर सिंग यांना सुट्टीकालीन न्यायालयात याचिका दाखल करण्याची मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:06 AM2021-05-07T04:06:31+5:302021-05-07T04:06:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अत्याचारप्रकरणी ठाण्यात नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अत्याचारप्रकरणी ठाण्यात नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने याप्रकरणी सिंह यांना सुट्टीकालीन न्यायालयापुढे याचिका दाखल करण्याची परवानगी दिली.
वेळेअभावी या याचिकेवर सुनावणी न घेता आल्याने न्या. एस.एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने सिंग यांना तातडी असले तर सुट्टीकालीन न्यायालयात याचिका दाखल करण्याची परवानगी दिली.
या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेणे आवश्यक नाही, असे राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितले.
गेल्या महिन्यात सिंग यांच्यावर अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा अकोला येथे बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी केलेल्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला. सिंग यांची ठाण्यात बदली करण्यात आली तेव्हा ते व अन्य काही पोलिसांनी मिळून भ्रष्टाचार केल्याचा आरोप घाडगे यांनी केला. घाडगे यांनी अकोला येथे सिंग यांच्याविरोधात तक्रार केली. अकोला पोलिसांनी झीरो एफआयआर नोंदवून पुढील तपासासाठी ताे ठाणे पोलिसांकडे वर्ग केला.
ठाणे पोलीस आयुक्तालयात कामाला असताना घाडगे यांना सिंह यांनी एका प्रकरणातील काही आरोपींची नावे वगळण्याचे आदेश दिले. मात्र त्यांनी तसे न केल्याने सिंग यांनी त्यांच्यावर खोटे आरोप ठेवले, अशी घाडगे यांची तक्रार आहे. त्यानुसार पोलिसांनी सिंग यांच्यावर आयपीसी अंतर्गत कट रचणे, पुरावे नष्ट करणे व अत्याचार प्रतिबंधक कायद्यातीलही काही कलम लावले.