Join us

कारमधील स्फोटके प्रकरणाचा अतिरेक्यांशी संबंध जोडण्याच्या कटामागे परमबीर सिंह?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 12:14 PM

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात कारमध्ये स्फोटके ही अतिरेकी संघटनेकडून ठेवल्याचा बनाव मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सूचनेनुसार रचण्यात आला होता, या निष्कर्षापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणा पोहोचल्याचे समजते.

- जमीर काझी मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात कारमध्ये स्फोटके ही अतिरेकी संघटनेकडून ठेवल्याचा बनाव मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सूचनेनुसार रचण्यात आला होता, या निष्कर्षापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणा पोहोचल्याचे समजते. त्यांच्या सांगण्यावरून सचिन वाझेने इतरांच्या मदतीने तसा बनाव रचल्याचा दाट संशय एनआयएला आहे.सचिन वाझे, प्रदीप शर्मा आदी आरोपींसह तिहार जेलमधील अतिरेकी इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक तेहसीन अख्तर याच्याकडे केलेल्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. २५ फेब्रुवारीला कार मायकेल रोडवर स्काॅर्पिओमध्ये जिलेटिनच्या २० कांड्या व धमकीचे पत्र आढळले होते. वाझेने त्याची लिंक दहशतवादी संघटनेशी जोडून त्याला दहशतवादाची किनार देण्याचा कट आखला. मात्र, या कटात सहभागी मनसुख हिरेन याने अटक करून घेण्यास नकार दिला, त्यामुळे सुपारी देऊन त्याची हत्या करण्यात आली. वाझेचा डाव आधीच उघडकीस येऊन बनावट दहशतवादी संघटनेचा बनाव उघड झाला होता.मिळालेल्या माहितीनुसार डी गँगशी संबंधित सुभाष सिंग ठाकूरने वाझेच्या सांगण्यावरून मध्यस्थीच्या माध्यमातून यूएई येथील सर्व्हरवरून सोशल मीडियावर मेसेज पाठवला. त्यासाठी मोबाइल फोन तिहार जेलमधील इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक तेहसीन अख्तर याच्याकडे पोहोचवण्यात आला. याची सर्व जबाबदारी तेहसीन घेईल याची पूर्ण सेटिंग केली होती. पण, याचदरम्यान या प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग झाला. 

परमबीर सिंह यांची एकदाच चौकशीया प्रकरणात एनआयएने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची आतापर्यंत केवळ एकदाच चौकशी केली आहे. मात्र, त्यानंतर शर्मासह अनेकांना अटक होऊन धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे परमबीर यांची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय तपास यंत्रणेने घेतला आहे.

टॅग्स :परम बीर सिंग