खंडणी प्रकरणात परमबीर सिंह यांना मिळाला दिलासा, बनावट गुन्हा, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 12:21 PM2024-01-31T12:21:57+5:302024-01-31T12:23:07+5:30
Parambir Singh : ‘मोक्का’तील आरोपी श्यामसुंदर अग्रवाल यांचा पुतण्या शरद अग्रवाल यांच्याकडून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी कोट्यवधींची खंडणी घेतल्याचा बनावट गुन्हा दाखल केल्याचा निष्कर्ष केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासात काढण्यात आला.
ठाणे - ‘मोक्का’तील आरोपी श्यामसुंदर अग्रवाल यांचा पुतण्या शरद अग्रवाल यांच्याकडून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी कोट्यवधींची खंडणी घेतल्याचा बनावट गुन्हा दाखल केल्याचा निष्कर्ष केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासात काढण्यात आला. सीबीआय न्यायालयातही तसाच दावा करून अलीकडेच या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे.
मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग, उपायुक्त पराग मणेरे, बिल्डर संजय पुनमिया, सुनील जैन आणि इतरांविरुद्ध कोणताही पुरावा मिळालेला नाही. अग्रवाल हे आर्थिक व्यवहारात प्रामाणिक नाहीत आणि खोट्या दिवाणी आणि फौजदारी खटल्यात व्यक्तींना अडकविण्याचा त्यांचा इतिहास असल्याची बाबही सीबीआयने उघड केली. अग्रवाल आणि बिल्डर संजय पुनमिया यांच्यात झालेला समझोता कोणत्याही दबावाशिवाय किंवा जबरदस्तीशिवाय झाल्याचे सीबीआयला तपासात आढळून आले आहे.
काय होती तक्रार?
शरद अग्रवाल याचे काका श्यामसुंदर व पुतण्या शुभम यांना नोव्हेंबर २०१६ मध्ये अटक झाली. त्यावेळी मनोज घोटकर यांच्यासोबत तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या घरी मदत मागण्यासाठी शरद गेले. तेथे संजय पुनमिया यांच्या सांगण्यावरून परमबीर सिंग, उपायुक्त पराग मणेरे यांनी पुनमिया यांच्याशी समझोता करून घेण्याची धमकी दिली. तसेच पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास अग्रवाल यांना ‘मोक्का’ लावण्याची धमकी दिली. सिंग यांच्या निर्देशावरूनच अग्रवाल याला अटक झाली. एक कोटी रुपये दिल्यानंतर सोडू, असा आरोप होता.