Nawab Malik: राज्यात पोलिसांच्या बदल्यांसाठीचं रॅकेट तत्कालीन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी उघडकीस आणलं होतं. पण त्यावर मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी कोणतची कारवाई केली नाही, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी फडणवीसांनी केलेले सर्व आरोप खोटे असून रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. (Rashmi Shukla Is An Agent Bf BJP Allegations By Nawab Malik)
"फोन टॅपिंगचे पुरावे घेऊन मी केंद्रीय गृहसचिवांना भेटतोय", देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार
"महाराष्ट्रात जेव्हा सरकार बनत होतं त्यावेळी रश्मी शुक्ला यांनी अवैधरित्या राज्यातील अनेक नेत्यांचे फोन टॅप केले. त्या भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या. बदल्यांच्या रॅकेट संदर्भात फडणवीसांच्या म्हणण्यानुसार शुक्ला यांनी परवानगी घेऊन फोन टॅप केले. पण शुक्ला यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार राज्यात पोलिसांच्या बदल्या झाल्याच नाहीत. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप सपेशल खोटे असल्याचं सिद्ध झालं आहे आणि हे सारं फडणवीसांना माहित असूनही ते फक्त सरकारची बदनामी करण्याचं काम करत आहेत", असं नवाब मलिक म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
फडणवीसांचं सरकार पाडण्याचं षडयंत्र"अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांत कोणतही तथ्य नाही. ते २७ फेब्रुवारीपर्यंत कुणालाही भेटलेले नाहीत. फडणवीस केवळ बेछुट आरोप करून सरकारला बदनाम करण्याचं काम करत आहेत. राजकीयदृष्ट्या हे सरकार पाडता आलं नाही म्हणून आता अधिकाऱ्यांचा वापर करुन ते सरकार पाडण्याचं षडयंत्र रचत आहेत", असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.
पोलिसांच्या बदल्यात गृहमंत्री करत नाहीपोलिसांच्या बदल्यांच्या संदर्भात फडणवीस गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर करत असलेले आरोप बाळबोध असल्याचंही नवाब मलिक म्हणाले. "पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी एक आयपीएस अधिकाऱ्यांची समिती असते. कोणताही गृहमंत्री थेट पोलिसाची बदली करत नाही. फडणवीस फक्त खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. दिल्लीत जाऊन गृहसचिवांना पुरावे देण्याची भाषा ते करत आहेत. त्यांना फक्त दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची बदनामी करायची आहे इतकाच त्यांचा उद्देश आहे", असा टोलाही नवाब मलिक यांनी यावेळी लगावला आहे.