स्वत:ला वाचवण्यासाठी परमबीर सिंग खोटा आरोप करताहेत; गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 07:14 PM2021-03-20T19:14:02+5:302021-03-20T20:03:45+5:30
Parambir Singh making false allegations says Anil Deshmukh: परमबीर सिंग यांची चौकशी होण्याची शक्यता असल्यानं ते खोटा आरोप करताहेत; गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळला
मुंबई: सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना (Sachin Vaze) राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) अटक करण्यात आल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना याबद्दल पत्र लिहिलं आहे.
टाईम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे.
मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 20, 2021
अनिल देशमुखांनी आरोप फेटाळले
"मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे," अशी प्रतिक्रिया यानंतर अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिली.
परमबीर सिंह यांची चौकशी होण्याची शक्यता
गेल्या १३ महिन्यांपासून परमबीर सिंग हे मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत होते. अंबानी यांच्या निवासस्थानाजळव सापडलेली स्फोटकं कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांच्या कथित आत्महत्याप्रकरण यावरुन उठलेल्या गदारोळामुळे परमबीर सिंग अडचणीत आले आहेत. आयुक्तपदावरुन त्यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर आता याप्रकरणी त्यांची चौकशीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांची बुधवारी तडकाफडकी बदली केल्याचे सूत्रांनी सांगितलं.