परमबीर सिंग आणखी अडचणीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:07 AM2021-05-21T04:07:35+5:302021-05-21T04:07:35+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी २०१७ मध्ये झालेल्या यूएलसी घोटाळ्यातील आरोपी बिल्डरांकडून ...

Parambir Singh in more trouble! | परमबीर सिंग आणखी अडचणीत !

परमबीर सिंग आणखी अडचणीत !

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी २०१७ मध्ये झालेल्या यूएलसी घोटाळ्यातील आरोपी बिल्डरांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याच्या आरोपप्रकरणी सखोल तपास करण्याचे आदेश राज्य सरकारने ठाणे पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

यूएलसी घोटाळ्याची चौकशी करताना माझ्या आदेशाशिवाय कोणाचीही चौकशी अथवा गुन्हे दाखल करू नका, असे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठाणे पोलिसांना स्पष्टपणे बजावले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचा सखोल तपास करण्यासाठी गृह विभागाने ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नेमले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यासंदर्भात २०१७ मध्येच एफआयआर दाखल झाला असून त्यानुसार ठाणे पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे गृह विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

यूएलसी घोटाळ्याच्या तपासात परमबीर सिंग यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप मीरा-भाईंदर येथील बिल्डर राजू शहा यांनी केला आहे. याबाबत त्यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यानुसार ठाणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून यूएलसी घोटाळ्याच्या तपासाशी संबंधित विविध अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदविले आहेत. परमबीर सिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची ही पाचवी तक्रार आहे. निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केली होती. आता यूएलसी घोटाळ्याच्या चौकशीत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी तपास सुरू झाल्याने परमबीर सिंग यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.

* सिंग यांच्याविरुद्धचा तपास सीआयडीकडे हस्तांतरित

अकोला येथील पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी केलेल्या तक्रारीवरून परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास गृह विभागाने सीआयडीकडे हस्तांतरित केला आहे. सीआयडीने याप्रकरणी बुधवारी क्रिकेट बुकी सोनू जालान, भीमराव घाडगे आणि जालानचा मित्र मुनीर अहमद पठाण यांचा जबाब नोंदवून घेतला.

---------------------

Web Title: Parambir Singh in more trouble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.