अहवाल बदलण्यासाठी सिंह यांनी पाच लाख दिले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 08:16 AM2021-09-09T08:16:24+5:302021-09-09T08:17:07+5:30
अँटालिया प्रकरण; सायबर सेल तज्ज्ञाचा जबाब
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अँटालिया स्फोटके प्रकरणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘जैश-उल-हिंद’च्या टेलिग्रामवरील पोस्टबाबतचा अहवाल सोयीप्रमाणे बदलून सादर करण्यासाठी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आपल्याला पाच लाख रुपये दिले, असा खळबळजनक खुलासा अहवाल सादर करणाऱ्या सायबर तज्ज्ञाने केल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
अँटालिया स्फोटके प्रकरणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘जैश-उल-हिंद’च्या टेलिग्रामवरील पोस्टबाबत अहवाल सादर करणाऱ्या सायबर तज्ज्ञाने एनआयए सांगितले की, त्याचा अहवाल प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी प्रकरणाशी संबंधित नाही. अहवालात सुधारणा करण्याचे आदेश तत्कालीन मुंबई पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी मला दिले होते. यासाठी तीन लाख रुपये देण्याचे ठरविण्यात आले. मात्र, पाच लाख रुपये दिले. त्याने दिलेल्या सेवेसाठी तो इतके पैसे मिळवण्यास पात्र आहे, असे सिंह यांनी म्हटले.
एनआयएने अँटालिया स्फोटके प्रकरणी दाखल केलेल्या १० हजार पानी आरोपपत्राला साक्षीदारांच्या जबाबांचीही प्रत जोडण्यात आली आहे. त्यात सायबर सेल तज्ज्ञाच्या जबाबाचाही समावेश आहे. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटीनने भरलेली एसयूव्ही सापडली तेव्हा दहशतवादी संघटना ‘जैश-उल-हिंद’ने त्यांचे सोशल प्लॅटफॉर्म टेलिग्रामवरून त्याची जबाबदारी घेतली. सायबर सेल तज्ज्ञाने एनआयएला दिलेल्या जबाबानुसार, तो त्याच दिवशी परमवीर सिंह यांना भेटला. जानेवारी २०२१ मध्ये इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी त्याने दिल्ली पोलिसांना मदत केल्याचे सिंह यांना सांगितले. या स्फोटाची जबाबदारी घेणाऱ्या ‘जैश-उल-हिंद’ची लिंक दिल्लीमधील तिहार कारागृहाशी आहे. पोस्ट टाकण्यासाठी तिहार कारागृहातला मोबाइल वापरण्यात आल्याचे त्याने सिंग यांना सांगितले.
nत्यावर सिंह यांनी त्यांच्यासाठी तसा अहवाल लिहिण्यास मला सांगितले आणि त्यांच्या कार्यालयात बसूनच मी अहवाल तयार केला. अहवाल वाचल्यानंतर सिंह यांनी टेलिग्राम चॅनेलवर ‘जैश-उल-हिंद’चे आलेले पोस्टर वापरण्यास सांगितले आणि अँटालिया स्फोटकाची जबाबदारीही त्याच संघटनेने घेतल्याचे नमूद करण्यास सांगितले. त्यानुसार, मी अहवालात सुधारणा केली आणि ‘जैश-उल-हिंद’चे नाव टाकून त्यांनी या घटनेची जबाबदारी घेतल्याचे नमूद केले, असे सायबर सेल तज्ज्ञाने एनआयएला सांगितले.