Join us

परमबीर सिंग यांनी खंडणीवसुलीसह मालमत्ता बळकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:06 AM

विरारमधील बिल्डरचा आरोप; प्रदीप शर्मा, कोथमिरेवरही कारवाई करण्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना साकडेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईचे ...

विरारमधील बिल्डरचा आरोप; प्रदीप शर्मा, कोथमिरेवरही कारवाई करण्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध तक्रारीची नवनवीन प्रकरणे उघड होत आहेत. ठाण्याचे आयुक्त असताना त्यांच्या सूचनेवरून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची आणि एन्काउंटरमध्ये मारण्याची धमकी देऊन खंडणी व मालमत्ता हडप केली, असा आरोप विरार येथील बांधकाम व्यावसायिक मयूरेश राऊत यांनी केला आहे.

खंडणीविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख प्रदीप शर्मा, निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या माध्यमातून आपल्याला लुबाडण्यात आल्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, परमबीर सिंग, प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे यांनी पदाचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल केली. माझ्यासह अनेक बिल्डरांना खोट्या गुन्ह्यात अडकवून, एन्काउंटरमध्ये ठार मारण्याची भीती दाखवून अनेकांची मालमत्ता स्वतःच्या नावे करून घेतली. ५ नोव्हेंबर २०१७ रोजी खंडणीविरोधी पथकाचे निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी माझे मित्र सतीश मांगले यांच्याविरुद्ध एका प्रकरणात एफआयआर दाखल झाल्याने मला बोलावले होते. त्यात माझा सहभाग नसल्याचे चौकशीअंती आढळून आल्यावर मला सोडून दिले. मात्र, काही दिवसांनंतर त्यांनी पुन्हा फोन करून प्रदीप शर्मा यांनी चौकशीसाठी बोलावल्याचे सांगितले. मला रात्रभर लॉकअपमध्ये डांबून ठेवले.

मांगले प्रकरणात माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची आणि एन्काउंटरमध्ये ठार मारण्याची धमकी देऊन त्यांनी लाथाबुक्क्यांनी व पट्ट्याने बेदम मारहाण केली. परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरून दोघांनी मला ठार मारण्याची भीती दाखवून पालघर येथील माझ्या निवासी बांधकाम प्रकल्पाची कागदपत्रे बळजबरीने बळकावून स्वतःच्या नावाने करार केला. दहिसर येथील ‘लोढा ॲक्वा’ इमारतीतील फ्लॅट तसेच माझ्या मालकीच्या फॉरच्युनर व मर्सिडीज या दोन कार कोथमिरे यांनी बळकावल्या. प्रदीप शर्मा, कोथमिरे यांनी माझी मालमत्ता हडपण्यासाठी पत्नी व भावाला धमकावून त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. घरातील महिलांचा विनयभंग केला, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

* अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, पुजारी टोळीशी संबंध असल्याचा आराेप

या प्रकरणी मी यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही काहीच कारवाई झालेली नाही. मात्र, आता परमबीर सिंग यांच्याविरोधात अनेक जण तक्रार करण्यास पुढे येत असल्यामुळे मीसुद्धा ही तक्रार केली आहे. त्यांचे व शर्माचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, रवी पुजारी टोळीशी घनिष्ठ संबंध होते, असा आरोपही राऊत यांनी निवेदनात केला आहे.

-------------------