परमबीर सिंग ‘लेटर बॉम्ब’प्रकरणी तपासाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:06 AM2021-04-10T04:06:12+5:302021-04-10T04:06:12+5:30

सीबीआय पथक एनआयए कार्यालयात दाखल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री ...

Parambir Singh speeds up probe into 'letter bomb' | परमबीर सिंग ‘लेटर बॉम्ब’प्रकरणी तपासाला वेग

परमबीर सिंग ‘लेटर बॉम्ब’प्रकरणी तपासाला वेग

Next

सीबीआय पथक एनआयए कार्यालयात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) एक पथक शुक्रवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कार्यालयात दाखल झाले होते. या वेळी निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेच्या जप्त केलेल्या डायरीसह अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांबाबत चौकशी करण्यात आली.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांनी पोलीस दलाला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा दावा केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसांत प्राथमिक तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे.

सीबीआयने परमबीर सिंग यांच्यासह याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि सचिन वाझे यांचे जबाब नोंदवले आहेत. तर, मुंबई पोलीस दलातील उपायुक्त डॉ. राजू भुजबळ यांना चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.

दरम्यान, सीबीआयने एनआयएने जप्त केलेली सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांची डायरी तपासासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यामध्ये वाझे खंडणी गोळा करत असलेल्या मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट्सचा तपशील आहे. शुक्रवारी एनआयए कोर्टाने डायरी उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य केली. ही डायरी सीबीआयसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यानुसार सीबीआयने शुक्रवारी एनआयए कार्यालयात दाखल होत, तपासासाठी लागणाऱ्या कागदपत्रांबाबत चौकशी केली. तसेच या वेळी वाझेकडेही चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चाैकशीसाठी सुमारे तीन ते साडेतीन तास सीबीआय पथक कार्यालयात होते. तसेच मुंबईतील बार, रेस्टॉरंट यांची माहिती घेऊन, यापैकी काही व्यावसायिकांकडेही सीबीआय चौकशी करणार असल्याचे समजते.

Web Title: Parambir Singh speeds up probe into 'letter bomb'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.