मुंबई : तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे ‘टार्गेट’ दिल्याचा खळबळजनक आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांना येथील दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी फरार घोषित केले. परमबीरसिंह यांच्याबरोबरच विनयसिंह ऊर्फ बबलू आणि निलंबित पोलीस रियाझ भाटी यांना ‘फरार’ घोषित करण्यासाठी मुंबई पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात शनिवारी अर्ज केला होता. ‘फरार’ घोषित केल्यानंतर ३० दिवसांत हे तिघेही उपस्थित न झाल्यास त्यांची संपत्ती जप्त केली जाईल.
बांधकाम व्यावसायिक विमल अगरवाल याने निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे व परमबीरसिंह यांच्याविरोधात खंडणी वसुलीचा गुन्हा गोरेगाव पोलीस ठाण्यात नोंदविला होता. या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने परमबीरसिंह, विनयसिंह व रियाझ भाटी यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी केले. आरोपींवर एकापेक्षा अधिक अजामीनपात्र वॉरंट जारी करूनही ते न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. या आधारावर या तिघांनाही ‘फरार’ घोषित करण्याची विनंती मुंबई पोलिसांनी किल्ला कोर्टाला केली होती.मुंबई पोलिसांच्या वतीने ॲड. शेखर जगताप यांनी परमबीरसिंह, विनयसिंह आणि रियाझ भाटी यांच्याविरोधात ठाणे न्यायालयाने जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट न्यायालयात सादर केले. ‘वॉरंटची अंमलबजावणी करण्याकरिता मुंबई पोलिसांनी एक पथक नियुक्त केले आहे. आरोपींच्या पत्त्यावर जाऊन पोलिसांनी चौकशी केली आहे.
परमबीरसिंह १९८८ च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. हरयाणामधील फरीदाबाद जिल्ह्यातील पावटा मोहबताबाद हे परमबीरसिंह यांचे मूळ गाव आहे. त्यांचे वडील होशियार सिंह हरयाणा नागरी सेवेत अधिकारी होते.
गुन्हा नोंदविल्यानंतर फरारगुन्हा नोंदविल्यानंतर संबंधित आरोपी त्यांच्या घरी गेलेच नाहीत. त्यांचा सध्याचा ठावठिकाणा कोणालाच माहीत नाही, अशी माहिती शेखर जगताप यांनी दंडाधिकारी एस. बी. भाजीपाले यांना दिली.
अनिल देशमुखांवर अन्यायच झालाअनिल देशमुख यांच्याविरोधात वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त फरार घोषित करण्यात आले आहेत. ते कुठे आहेत, याचा थांगपत्ता नाही. दुसरीकडे देशमुख अद्यापही कोठडीत आहे. हे बरोबर नसून, त्यांच्यावर अन्यायच झाला आहे.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस