Join us

परमबीर सिंग, ‘त्या’ बार मालकांवर अद्याप कारवाई का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:06 AM

सचिन सावंत यांचा ईडीला सवाललोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ...

सचिन सावंत यांचा ईडीला सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून ४.२० कोटीची मालमत्ता जप्त करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयावर (ईडी) काँग्रेस नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याप्रकरणी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि संबंधित बारमालकावर अद्याप का कारवाई केली नाही, त्यांना का वाचविले जात आहे?, अशी विचारणा प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

आपल्या ट्विटरवरून ईडीवर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी पक्षपाती कारवाईबद्दल टीकेची झोड उठवली आहे. सचिन सावंत यांनी ईडीला ४ प्रश्न विचारले आहेत. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानुसार १०० कोटी गोळा करण्याचे निर्देश सचिन वाझेला दिल्याची माहिती असूनही त्यांनी त्यावेळी कोणतीही कारवाई केली नव्हती, त्याबाबत सिंग यांच्यावर का कारवाई केली नाही, तसेच ईडीच्या म्हणण्यानुसार डान्स बारचालकांनी वाझेंच्या माध्यमातून ४.७० कोटी दिले. तर मग त्या बारचालकांना अद्याप अटक का केली नाही?

नुकत्याच जप्त केलेल्या उरणमधील जागेची किंमत ईडीकडून २.६७ कोटी असल्याचे सांगण्यात आले असताना ती ३०० कोटींची असल्याची माहिती माध्यमांना कोण देत आहे. त्याचप्रमाणे वरळीतील जप्त केलेला फ्लॅट २००४ मध्ये खरेदी केला होता, त्याचा आत्ताच्या प्रकरणाशी संबंध कसा जोडला जाऊ शकतो? अशी विचारणा सचिन सावंत यांनी केली आहे.