लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची प्राथमिक चौकशी करण्यात राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी नकार दिल्याने ही जबाबदारी आता वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांवर सोपविली जाणार आहे. आयएएस अधिकाऱ्यांच्या त्रिसदस्यीय समितीकडून ही चौकशी केली जाईल. त्यांची नियुक्ती लवकरच करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सिंग यांनी ऑल इंडिया सर्व्हिसेस (आचार नियम)चे उल्लंघन केल्याबद्दल आणि निरीक्षक अनुप डांगे यांनी केलेल्या गंभीर आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी संजय पांडे यांची नियुक्ती केली होती. त्याबाबत अनुक्रमे १ व २० एप्रिलला आदेश जारी केले होते.
दरम्यान, सिंग यांनी संजय पांडे यांच्याशी व्हाॅट्सॲप कॉलवरून केलेले संभाषण रेकॉर्ड केले. त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप करीत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे पांडे यांनी या प्रकरणाचा परिणाम होऊ नये, यासाठी चौकशीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सरकारला दुसरा चौकशी अधिकारी नेमावा लागणार आहे.
......................