मुंबई : तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारवर टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’चे मोठे स्फोट होत आहेत. त्याचबरोबर आता या प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) लक्ष घालण्याची शक्यता आहे. गृहमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्याला मुंबईतून महिन्याला १०० कोटींची वसुली करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केल्याने त्यामागील आर्थिक कनेक्शन त्याच्याकडून तपासले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गृहमंत्री देशमुख व राज्य सरकारच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात सचिन वाझे यांना १०० कोटी वसूल करण्याचे टार्गेट देण्यात आले होते, असे नमूद केले आहे. हे पत्र राज्यपालांनाही आज, सोमवारी देणार असल्याचे परमबीर सिंग यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यामागील आर्थिक कनेक्शन तपासण्यासाठी हे प्रकरण ‘ईडी’कडे पाठविले जाऊ शकते. त्याचप्रमाणे आरोपांचे गांभीर्य समजून‘ईडीही’ स्वतःहून तपास करू शकते. परमबीर यांचा जबाब नोंदवून त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. याबाबत विरोधी पक्षाकडून तक्रार नोंदवली गेल्यासही ‘ईडी’कडून हे प्रकरण हाताळले जाऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.