लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या १०० कोटी रुपयांच्या वसुली टार्गेट दिल्याच्या आरोपांवरून राज्यातील मंत्र्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे; मात्र नुकत्याच मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या खंडणीच्या गुह्यांत परमबीर सिंह यांच्या निकटवर्तीय व्यावसायिक संजय पुनामिया याने मार्चमध्येच राज्यातील मंत्र्यांंच्या विकेटचे भाकीत केल्याची धक्कादायक माहिती तक्रारदाराच्या जबाबातून समोर आली आहे, तसेच राज्यातील सरकार पडून परमबीर सिंह पुन्हा मुंबई पोलीस आयुक्त पदावर येणार असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात व्यावसायिक श्याम अग्रवाल यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्यासह पोलीस उपायुक्त अकबर पठाण आणि एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात संजय पुनामिया आणि सुनील जैनला अटक करण्यात आली आहे.
यात तक्रारदाराने दिलेल्या जबाबात, सिंह तसेच त्यांच्या सहकाऱ्याने मागितलेल्या खंडणीचा लेखाजोखा मांडला. दुसरीकडे, २३ मार्च ते ३० मार्च रोजी पुनामियासोबत झालेल्या बैठकादरम्यान त्याच्या मोबाइलवर परमबीर सिंह आणि पोलीस उपायुक्त अकबर पठाण व इतर अधिकारी यांचे वेळोवेळी फोन येत होते. तेव्हा संजय पुनामियाने दावा केला होता की, सिंह यांच्या १०० कोटी जमा करण्यासंबंधित पत्राबाबत सीबीआय, एनआयए चौकशी सुरू होणार, चार ते पाच मंत्र्यांंची विकेट पडणार, सरकार अडचणीत येणार. तसेच वाझे संपर्कात असल्याचे सांगितले होते. पुनामियावर महाराष्ट्र सरकारमधील मोठ्या नेत्यांची विकेट घेण्याची जबाबदारी घेतल्याचेही नमूद केले. लवकरच महाराष्ट्र सरकार पडेल आणि सिंह पुन्हा आयुक्त पदावर येणार किंंवा केंद्र सरकार सिंह यांना मोठे पद देणार असल्याचे भाकीत केले होते.’
पुनामियाने सांगितलेले घडत गेल्यामुळे तक्रारदार घाबरले आणि तक्रारीसाठी पुढे आले नसल्याचे जबाबात नमूद केले आहे, तसेच या बैठकांदरम्यान वॉइज रेकॉर्डिंग असलेले दोन पेन ड्राइव्हमध्ये पोलिसांना देण्यात आले आहेत. यात तीन आणि दोन तासांच्या रेकॉर्डिंगचा समावेश आहे. त्यानुसार, मरीन ड्राइव्ह पोलीस अधिक तपास करीत आहेत.