एसीपी, डीसीपीकडून सत्यता पडताळणार; कमी अवधीमुळे चौकशी होणार वेगात
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्राथमिक चौकशीत आरोप करणाऱ्या माजी आयुक्त परमबीर सिंग यांचा सविस्तर जबाब नोंदविला जाईल. त्याचबरोबर त्यांच्या ‘लेटरबॉम्ब’मध्ये नमूद असलेल्या डीसीपी भुजबळ व एसीपी पाटील यांच्याकडे चौकशी केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे गंभीर गुन्ह्याप्रकरणी एनआयएच्या कोठडीत आहे, त्यामुळे सुरुवातीला अन्य साक्षीदारांकडे चौकशी केल्यानंतरच त्याच्याकडे मोर्चा वळविला जाणार असल्याचे समजते.
मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी वाझेला महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप करीत राज्याच्या राजकारणात आणि पोलीस दलात खळबळ उडवून दिली. त्या पत्राच्या आधारे सीबीआय चौकशी करण्याबाबत ॲड. जयश्री पाटील यांनी केलेली याचिका उच्च न्यायालयाने मान्य करून त्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे प्राथमिक चौकशी झपाट्याने करावी लागणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
राज्य सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय सीबीआयला कसल्याही प्रकारच्या चौकशीत हस्तक्षेप करण्याचे अधिकार नाहीत, त्यामुळे पहिल्यांदा राज्य सरकारला कोर्टाच्या आदेशाची प्रत द्यावी लागेल, त्यानंतर ॲड. पाटील यांची तक्रार व जबाब नोंदवून घेतला जाईल, त्यानंतर परमबीर सिंग यांच्याकडे त्यांचे पत्र व अन्य पुराव्यांबद्दल विचारणा केली जाईल. त्यांनी नमूद केलेल्या दोन अधिकाऱ्यांकडेही सविस्तर चौकशी केली जाईल, त्यानंतर सचिन वाझेकडेही चौकशी करण्यात येईल. त्यासाठी सीबीआयला त्याचा काही काळासाठी ताबा घ्यावा लागेल, मात्र सध्या त्याला प्राधान्य न देता सिंग यांच्या आरोपात तथ्य आहे की नाही, आराेप कितपत गंभीर आहेत, याच्या चाैकशीस प्राथमिक तपासात प्राधान्य दिले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
..........................
.........................