मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे मुंबईत दाखल झाल्यापासून चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे सुरू आहे. मुंबई आणि ठाणे पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहिल्यानंतर आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सिंह यांना समन्स बजावले आहे. त्यानुसार सोमवारी आणि मंगळवारी सिंह यांना चौकशीला बोलावण्यात आले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) कडून अधिक तपास सुरू आहे. तर राज्य सरकारही चांदीवाल आयोग स्थापन करून या आरोपांची चौकशी करत आहे. या आरोपानंतर परमबीर यांच्या विरोधातही गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली. मुंबई आणि ठाणे पोलिसांत एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत. यातील तीन गुन्ह्यांचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) तपास करत आहे.
७ महिन्यांनी रेंजमध्ये आलेले परमबीर हे गुरुवारी मुंबईत दाखल होताच संबंधित यंत्रणांकडून समन्स बजावून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे पोलिसांच्या चौकशीपाठोपाठ सीआयडीने त्यांना समन्स बजावून सोमवारी आणि मंगळवारी हजर राहण्यास सांगितले आहे. दुसरीकडे सोमवारी चांदीवाल आयोगासमोर ते चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे परमबीर यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या चौकशींना ते कसे सामोरे जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सीआयडी या गुन्ह्यांची करणार चौकशी
भाईंदरमधील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलिसांनी दाखल केलेल्या खंडणी वसुली आणि ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात सीआयडी सुरुवातीला त्यांच्याकडे तपास करणार आहे. तसेच ठाण्यातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातून सीआयडीला वर्ग झालेल्या भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा तपासही सीआयडी करत आहे.