परमबीर सिंग यांचा ‘दबंग अधिकारी’ म्हणून लौकिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 05:16 AM2020-03-01T05:16:05+5:302020-03-01T05:16:38+5:30

पोलीस खात्यामध्ये तत्परता आणि धडाडीपणा महत्त्वाचा समजला जात असून परमबीर सिंग यांच्यामध्ये तो पुरेपूर असल्याचे वेळोवेळी दिसून आले.

Parambir Singh's reputation as a 'domineering officer' | परमबीर सिंग यांचा ‘दबंग अधिकारी’ म्हणून लौकिक

परमबीर सिंग यांचा ‘दबंग अधिकारी’ म्हणून लौकिक

Next

जमीर काझी 
मुंबई : पोलीस खात्यामध्ये तत्परता आणि धडाडीपणा महत्त्वाचा समजला जात असून परमबीर सिंग यांच्यामध्ये तो पुरेपूर असल्याचे वेळोवेळी दिसून आले. एखादे उद्दिष्ट निश्चित केल्यानंतर कितीही विपरीत परिस्थिती आली तरी ते साध्य केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. सभोवतालची परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार योग्य निर्णय घेणारा दबंग, प्रॅक्टिकल अधिकारी अशी त्यांची खात्यात ओळख आहे.
मुंबईच्या आयुक्तपदासाठी परमबीर सिंग यांचे नाव चार-पाच वर्षांपासून प्रत्येक निवडीवेळी चर्चेत होते. या वेळी मात्र त्यांच्यासोबत महासंचालक दर्जाचे अनेक ज्येष्ठ अधिकारी तसेच त्यांच्या तुकडीतील अधिकाऱ्यांची नावेही चर्चेत होती. अखेर राज्य सरकारने सिंग यांच्यावर जबाबदारी सोपविली.
शिस्तप्रिय, स्पष्टवक्ते व झटपट अचूक निर्णय घेण्याचा लौकिक असलेल्या परमबीर सिंग यांनी मुंबईत अनेक वर्षे सेवा बजावली. त्यामुळे त्यांना शहरातील परिस्थिती, अधिकाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीचा अनुभव आहे. ते ठाणे आयुक्तपदी असताना अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. याच कालावधीत कुख्यात गॅँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला खंडणीच्या गुन्ह्यातून मुंबईतून अटक करण्यात आली.
> असे झाले शिक्कामोर्तब
मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्तीसाठी अनेक वरिष्ठ आयपीएस इच्छुक होते. त्यांनी त्यासाठी राष्टÑवादीचे शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी वैयक्तिक भेटी घेतल्या होत्या. गुरुवारपासून नियुक्तीच्या प्रक्रियेने वेग घेतला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यात या विषयावर चर्चा झाली. शनिवारी सकाळी सर्व संमतीने शिक्कामोर्तब झाल्यानंतर परमबीर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली.
>एसीबीची धुरा कोणाकडे?
रिक्त झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पदावर अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. तात्पुरता पदभार या विभागातील अप्पर महासंचालक बी.के. सिंह यांच्याकडे दिला आहे. एसीबीसाठी सध्या कार्यरत असलेल्या एका महासंचालकाची नियुक्ती होईल. त्याचवेळी शुक्ला यांची सुरक्षा महामंडळात पदोन्नतीवर बदली केली जाईल, असे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले.
>दोन दिवसांपूर्वीच्या बदल्यांना स्थगिती
मुंबईचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपले वेगळेपण दाखविण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी माजी आयुक्त संजय बर्वे यांनी केलेल्या २५ अधिकाºयांच्या बदल्यांना त्यांनी स्थगिती दिली. पुढील आदेश येईपर्यंत त्यांना पूर्वीच्या ठिकाणाहून कार्यमुक्त न करण्याची सूचना दिली. बर्वे यांच्या वाढीव मुदतीला अवघे दोन दिवस उरले असताना मुंबईतील प्रत्येकी चार साहाय्यक आयुक्त व वरिष्ठ निरीक्षकांसह एकूण २५ पोलीस अधिकाºयांच्या प्रशासकीय कारणास्तव तडकाफडकी बदल्या केल्या होत्या. बदली, पदोन्नतीवर जिल्ह्याबाहेर सोडण्याचे आदेश दिले होते. सिंग यांनी पदभार स्वीकारल्यानंतर २७ फेबु्रवारी रोजी परिपत्रकाद्वारे जारी केलेले आदेश पुढील सूचनेपर्यंत रद्द करण्याचे आदेश दिले. सहआयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांनी त्यांच्या वतीने हे आदेश जारी केले.

Web Title: Parambir Singh's reputation as a 'domineering officer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.