परमबीर सिंग यांची एनआयएकडून कसून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:06 AM2021-04-08T04:06:54+5:302021-04-08T04:06:54+5:30

प्रदीप शर्मांची झाडाझडती; तपास निर्णायक टप्प्यात लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटेेलिया या निवासस्थानाजवळ सापडलेली ...

Parambir Singh's thorough interrogation by NIA | परमबीर सिंग यांची एनआयएकडून कसून चौकशी

परमबीर सिंग यांची एनआयएकडून कसून चौकशी

Next

प्रदीप शर्मांची झाडाझडती; तपास निर्णायक टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटेेलिया या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटक कार आणि ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व होमगार्डचे महासमदेशक परमबीर सिंग आणि माजी पोलीस निरीक्षक व वादग्रस्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्याकडे बुधवारी कसून चौकशी केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेशी असलेले संबंध आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याशी साधलेला संपर्काबाबत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याचे समजते.

परमबीर सिंग एकूण ३ तास ५० मिनिटे एनआयएच्या पेडर रोड येथील कार्यालयात होते. आवश्यकता वाटल्यास त्यांना पुन्हा बाेलावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले तर प्रदीप शर्मा यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

गेल्या जवळपास महिन्याभराच्या तपासात एनआयएच्या पथकाने बुधवारी पहिल्यांदाच अतिवरिष्ठ आणि नावाजलेल्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. तत्कालिन आयुक्त परमबीर सिंग आणि प्रदीप शर्मा यांच्याकडे चौकशी केल्याने या प्रकरणाचा तपास निर्णायक टप्प्यात आल्याचे स्पष्ट होते.

या गुन्ह्यामध्ये वाझेला १३ मार्चला अटक झाल्यानंतर राज्य सरकारने १७ मार्चला परमबीर सिंग यांची होमगार्डला बदली केली. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझेला दर महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला. सध्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय या आरोपाची प्राथमिक चौकशी करत आहे तर देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले.

* सविस्तर जबाब नाेंदवला

दरम्यान, परमबीर सिंग बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एनआयए कार्यालयात पोहोचले. एनआयएचे विशेष महानिरीक्षक शुक्ला यांच्या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली. वाझेला मुंबई पोलीस दलात पुन्हा घेण्यापासून ते अँटिलिया स्फोटक कार प्रकरणाचा तपास त्याच्याकडे सोपविण्यापर्यंतच्या आदेशाबाबत सविस्तर जबाब नोंदविण्यात आल्याचे समजते. दुपारी १ वाजून २० मिनिटांच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. जवळपास ३ तास ५० मिनिटे त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत माजी पोलीस अधिकारी आणि वादग्रस्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा पाऊणच्या सुमारास एनआयएच्या कार्यालयात आले. हिरेन यांच्या हत्येबाबत आणि वाझेशी असलेल्या संबंधांबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू होती.

---------------------

Web Title: Parambir Singh's thorough interrogation by NIA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.