निमलष्करी जवानांना हवा सैनिकांचा दर्जा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 03:37 AM2018-10-25T03:37:19+5:302018-10-25T03:37:25+5:30
केरळ, गोवा, दीव-दमणसह विविध राज्यांत निमलष्करी दलातील जवानांना सैनिकांप्रमाणेच सोयी-सुविधा मिळत असून महाराष्ट्रात मात्र त्यांची उपेक्षा होत आहे.
- चेतन ननावरे
मुंबई : केरळ, गोवा, दीव-दमणसह विविध राज्यांत निमलष्करी दलातील जवानांना सैनिकांप्रमाणेच सोयी-सुविधा मिळत असून महाराष्ट्रात मात्र त्यांची उपेक्षा होत आहे. ते सैनिकांप्रमाणेच कर्तव्य बजावतात़ तरीही त्यांना शहिदांचा दर्जा मिळत नाही़ तसेच या निमलष्करी जवानांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक, वैद्यकीय आणि शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याची खंत माजी अर्ध सैनिक वेल्फेअर असोसिएशनने व्यक्त केली आहे.
यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष दिलीप शार्दुल यांनी सांगितले की, सीमेवर करडी नजर ठेवून बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, इंडियन तिबट बॉर्डर पोलीस फोर्स, सीमा सुरक्षा बलाचे जवान देशाचे रक्षण करतात. देशातील महत्त्वाची विमानतळे, बंदरे, परमाणू केंद्रांच्या सुरक्षेची जबाबदारीही या जवनांवर आहे. सैनिकांप्रमाणे कर्तव्य बजावत असताना पोलिसांप्रमाणे मोबदला मिळत असल्याने जवानांच्या कुटुंबियांची परवड होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दरवर्षी विविध चकमकींमध्ये निमलष्करी जवानांचा मृत्यू होतो किंवा ते गंभीर जखमी होतात. मात्र महाराष्ट्रात सैनिकांप्रमाणे कोणत्याही प्रकारचा मोबदला या जवानांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना मिळत नाही. याउलट केरळ, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, दीव-दमण अशा विविध राज्यांतील निमलष्करी जवानांना सैनिकांप्रमाणेच शहीद झाल्यावर विविध वैद्यकीय, शैक्षणिक आणि शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे. भविष्याची योग्य तरतूद करण्यात प्रशासन टाळाटाळ करत असल्याने जवानांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचेही शार्दुल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
निमलष्करी जवानांमधील सुरेश मुंडे यांनी सांगितले की, आसाम रायफल्सचे जवानांपासून विविध क्षेत्रात काम करणारे निमलष्करी जवान काश्मीरसह नक्षलवादी क्षेत्रात जीवाची बाजी लावत आहेत. गेल्या पाच वर्षांत देशात ५१ हजार निमलष्करी जवान निवृत्त, तर ३५ हजारांहून अधिक जवान आत्तापर्यंत सेवा बजावातना मृत्यू पावले आहेत. मात्र सैनिकांचा आणि शहिदांचा दर्जा मिळत नसल्याने निवृत्त जवानांचे आणि मृत जवानांच्या कुटुंबियांचे योग्य पुनर्वसन होत नसल्याचे खेदाने सांगावे लागत आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही सैनिकांचा दर्जा देऊन गडचिरोलीसह विविध ठिकाणी सेवा बजावणाऱ्या जवानांचे मनोधैर्य वाढवण्याची गरज आहे.
>आज काढणार मोर्चा
माजी सैनिकांचा दर्जा मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी माजी अर्धसैनिक वेल्फेअर असोसिएशनने आझाद मैदानावर २५ आॅक्टोबरला धडक मोर्चाची हाक दिली आहे.
या ठिकाणी एक दिवसाचे उपोषण करून माजी जवान आपली व्यथा मांडतील.