परळचा बारादेवी शिव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 06:29 AM2019-06-23T06:29:38+5:302019-06-23T06:29:51+5:30

इसवी सनाच्या सहाव्या शतकात मुंबईच्या उत्तर भागात बौद्धांचा मोठा प्रभाव होता. कान्हेरी, महाकाली, मागाठणे यासारख्या बौद्धमठांच्या वर्चस्वाखाली महायान बौद्ध मताचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत होता. यांनाच समकालीन जोगेश्वरी, घारापुरी व मंडपेश्वरच्या गुहामंदिरांचा जन्म झाला. मुंबईचा दक्षिणेकडील भाग हा शैवांच्या अधिपत्याखाली असावा.

 Parel Baradvi Shiva | परळचा बारादेवी शिव

परळचा बारादेवी शिव

Next

- डॉ. सुरज अ. पंडित

९ आॅक्टोबर १९३१ रोजी परळ ते शिवडी या रस्त्याचे बांधकाम चालू असताना हाफकिन इन्स्टिट्यूटजवळ एक प्रचंड मोठी एकाश्म शिल्पाकृती सापडली. शिल्पाकृतीबरोबरच काही भग्न शीला व मूर्ती सापडल्या होत्या. यापैकी एक लहान शैवमूर्ती आज छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आहे. परळ शिव या नावाने ती ओळखली जाते. परळ येथे सापडलेल्या मोठ्या शैवमूर्तीची प्लास्टरमध्ये बनवलेली प्रतिकृतीही वस्तुसंग्रहालयात या मूर्तीच्या जवळच पाहायला मिळते. या दोन्ही शिवमूर्ती आहेत हे निश्चित. यांच्या मूर्तीशास्त्रीय लक्षणांची, लांछनांची अनेक विद्वानांनी चर्चा केली आहे. तरीही यापैकी मोठ्या मूर्तीची निश्चित ओळख आजही पटलेली नाही.
सहाव्या शतकात काळ्या रंगाच्या बसाल्ट दगडांमध्ये बनवलेली ही महाकाय मूर्ती साधारण साडेतेरा फूट उंच आहे. यातील कलाकुसर अतिशय प्रेक्षणीय असून त्यातील मुख्य मूर्ती व इतर
मूर्तीची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे.
या शिल्पातील एकूण बारा
मूर्ती कोरलेल्या असून मध्यभागी एक
उभी शिवाची प्रतिमा आहे. या
मूर्तीच्या पायाजवळ बसलेल्या पाच प्रतिमांपैकी तीन काहीशा अपूर्णावस्थेतील वाटतात. मुख्य शिवप्रतिमेतून आणखी सहा प्रतिमा उद्भवताना दाखवल्या आहेत. मध्यभागी असलेल्या सर्वोच्च मूर्तीला चार हात असून इतर सर्व अर्धमूर्ती व मूर्तींना दोन हात दाखवले आहेत. अशा बारा मूर्तींमुळे या शिल्पपटाला स्थानिकांनी बारादेवी असे नाव दिले आहे. या साऱ्याच मूर्तींनी छोटे मुकुट परिधान केलेले असून नागादि लांछनेही पाहायला मिळतात.
उपरोक्त परळ शिवाची
मूर्तीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याने हातात त्रिशूल धारण केला असून या त्रिशुळाला नागाचे वेष्टण आहे. डोक्यावर जटामुकुट असून, खांद्यावर रुळणाºया जटा कलाकाराने अतिशय सुंदर प्रकारे दाखवल्या आहेत. त्याने कर्णकुंडले परिधान केलेली असून त्याचे
उत्तरीय विशेष आहे. त्याच्या
मांडीवर दाखवलेल्या वाघाच्या
मुखामुळे बहुधा हे कृत्तिवास असावे असे वाटते.
काही विद्वानांच्या मते परळ येथे प्रशिक्षण देऊन नंतर घारापुरीच्या लेण्या व मूर्ती करण्यात आल्या असाव्यात. परंतु हा तर्क मान्य करणे कठीण वाटते. परळ-शिवडी येथे शिल्पपट कोरून घरापुरीला नेणेही फारच कठीण आहे. घरापुरीला सापडलेल्या काही सुट्या मूर्ती स्थानिक दगडात कोरलेल्या असाव्यात असे वाटते. म्हणूनच परळ-शिवडी येथे स्वतंत्र शैवकेंद्र असावे व याच केंद्रात या मूर्ती घडवल्या गेल्या असाव्यात, असे म्हणण्यास वाव आहे. बारादेवीची प्रत्यक्ष मूर्ती ही सदाशिवाची असावी आणि ‘परळ शिव’ म्हणून ओळखली जाणारी लहान मूर्ती द्वारपालाची असावी असे वाटते. या परिसरात इतरही काही विरगळ व इतर पुरातत्त्वीय अवशेष सापडले
आहेत. यामुळे येथे धार्मिक केंद्र अथवा मंदिर वा मठ असण्याला पुष्टी
मिळते. परळ येथील या शैवमठाचा घारापुरी, जोगेश्वरी अशा इतर शैवमठांशी जवळचा संबंध असावा. विस्मृतीत गेलेले हे सदाशिवाचे शिल्प भारतीय शिल्पकलेतील एकमेवाद्वितीय असे उदाहरण आहे. याचा अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे.
(लेखक साठ्ये महाविद्यालयात
प्राचीन भारतीय संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाचे विभागप्रमुख आहेत.)
 

Web Title:  Parel Baradvi Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई