परेल, एलफिन्स्टन स्टेशनवर मोठया दुर्घटनेच्या प्रतिक्षेत होते रेल्वे प्रशासन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 01:33 PM2017-09-29T13:33:40+5:302017-09-29T13:44:48+5:30

मागच्या दोन दशकांपासून परेल, लोअर परेल, वरळी, करीरोड या पट्ट्यात मोठे बदल होत आहेत. आधी गिरणगाव म्हणून ओखळला जाणारा हा भाग आता कॉर्पोरेट सेंटर बनत चालला आहे.

 Parel, Elphinstone was awaiting a major accident on the railway administration | परेल, एलफिन्स्टन स्टेशनवर मोठया दुर्घटनेच्या प्रतिक्षेत होते रेल्वे प्रशासन

परेल, एलफिन्स्टन स्टेशनवर मोठया दुर्घटनेच्या प्रतिक्षेत होते रेल्वे प्रशासन

Next
ठळक मुद्दे परेल, लोअर परेल पट्ट्यात टॉवर उभे राहू लागल्यानंतर अनेक कंपन्यांची कार्यालये या भागात सुरु झाली. नरीमन पाँईटच्या तुलनेत जागांचे भाव कमी असल्याने इथे अनेक कंपन्या आल्या.

मुंबई - मागच्या दोन दशकांपासून परेल, लोअर परेल, वरळी, करीरोड या पट्ट्यात मोठे बदल होत आहेत. आधी गिरणगाव म्हणून ओखळला जाणारा हा भाग आता कॉर्पोरेट सेंटर बनत चालला आहे. अनेक बडया कंपन्यांची कार्यालये, बँका, हॉस्पिटल्स या भागात आहेत. परेल-लालबागमध्ये चाळींची जागा आता टोलेजंग टॉवरनी घेतली आहे. 80-90च्या दशकात नरीमन पाँईट, कफ परेड या भागात कंपन्यांची ऑफीसेस होती. मुंबईतील प्रमुख वित्तीय केंद्र म्हणून हा भाग ओळखला जायचा. 

पण परेल, लोअर परेल पट्ट्यात टॉवर उभे राहू लागल्यानंतर अनेक कंपन्यांची कार्यालये या भागात सुरु झाली. ही कार्यालय परेल, लोअर परेलमध्ये येण्यामागे मुख्य कारण होते जागांचे दर. नरीमन पाँईटच्या तुलनेत जागांचे भाव कमी असल्याने इथे अनेक कंपन्या आल्या. दररोज लाखो नोकरदार इथे येत असतात. त्यामुळे परेल-एलफिन्स्टन स्टेशन तुम्हाला नेहमीच प्रवाशांनी भरलेले दिसेल. परेल, एलफिन्स्टन, करीरोड स्टेशनवर होत असलेला हा बदल दररोज इथे येणारे नोकरदार, स्थानिकांना जाणवत होता. 

दिवसेंदिवस वाढणारा ताणही दिसत होता. पण रेल्वे प्रशासनाला हा मोठा बदल दिसला नाही. मध्य रेल्वे मार्गावर  परेल, करीकरोड तर, पश्चिम रेल्वे मार्गावर एलफिन्स्टन, लोअर परेल ही स्थानके इथे आहेत. त्यात परेल आणि एलफिन्स्टन ही दोन्ही स्थानके समोरासमोर आहेत. जिथे दुर्घटना घडली तो पूल या दोन्ही रेल्वे स्टेशन्सना जोडतो. 20 व्या शतकाच्या आरंभी देशात पहिल्या टप्प्यात जो रेल्वेचा विकास झाला त्यावेळी परेल, एलफिन्स्टन, करीरोड स्थानके बांधण्यात आली. त्यावेळच्या गरजेनुसार या रेल्वे स्टेशनची रचना करण्यात आली होती. 

पण बदलता काळ आणि वेळ यानुसार रेल्वेने मात्र कुठलाही बदल केला नाही. जेव्हा हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जायचा त्यावेळी गिरणीकामगार जवळपासच राहायचे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर इतकी गर्दी नसायची. पण 1990 पासून इथली परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. पण रेल्वे प्रशासनाने आवश्यक बदल न करता दुर्घटनेला निमंत्रण दिले. ज्यामध्ये आज निष्पाप नागरीकांचा मृत्यू झाला. परेल आणि एलफिन्स्टनचा आज मुंबईतील सर्वाधिक गर्दीच्या आणि धोकादायक स्थानकांमध्ये समावेश होतो. 

रोज गर्दीच्यावेळी इथे चेंगराचेंगरी होत असते फरक इतकाच की, आज ही चेंगराचेंगरी भीषण दुर्घटनेमध्ये बदलली. जेव्हा तुम्ही परेल आणि एलफिन्स्टन स्थानकाकडे जाता तेव्हा तुम्हाला खडड्यातून मार्ग काढावा लागतो. एखादे वाहन बाजून गेले तर चिखलाचा प्रसाद मिळतो तो वेगळाच. परेल स्टेशन परिसरात काही बेकायदा बांधकामेही आहेत. इतक्या वर्षात या स्टेशनवर झालेला सर्वात मोठा बदल म्हणजे रोडचे नामकरण. एलफिन्स्टन  स्टेशनचे आता प्रभादेवी असे नामकरण झाले आहे. 
 

Web Title:  Parel, Elphinstone was awaiting a major accident on the railway administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.