शुल्कवाढीविरोधात पालकांची निदर्शने
By admin | Published: April 21, 2017 01:03 AM2017-04-21T01:03:21+5:302017-04-21T01:03:21+5:30
पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेश शुल्कासह वार्षिक शुल्कात शाळांनी वाढ केल्याविरोधात विद्यार्थ्यांसह पालकांनी गुरुवारी आझाद मैदानात निदर्शने केली
मुंबई : पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेश शुल्कासह वार्षिक शुल्कात शाळांनी वाढ केल्याविरोधात विद्यार्थ्यांसह पालकांनी गुरुवारी आझाद मैदानात निदर्शने केली. या प्रकरणी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पालक, शाळा प्रशासनाशी बैठक घेऊन कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा दिला.
पालक साक्षी डहाणूकर यांनी सांगितले की, विविध १० शाळांतील पालकांनी विद्यार्थ्यांसह आझाद मैदानात आंदोलन केले. बुधवारी दुपारी पश्चिम उपनगरातील युनिव्हर्सल हायस्कूल, ठाकूर इंटरनॅशनल हायस्कूल, लोखंडवाला हायस्कूल आणि सेंट अॅन्स हायस्कूल या शाळांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बैठक घेतली. दरवर्षी शुल्कात वाढ करता येणार नसल्याचे तावडे यांनी प्रशासनाला सांगितले. शिवाय कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. मात्र, काही शाळा प्रशासनाने राज्य सरकारचा कायदा आपल्याला बंधनकारक नसल्याचे सांगून कोणतीही कारवाई केल्यास उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत शाळा प्रशासन असल्याचे समजते.
पालकांनी सांगितले की, सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाच्या बहुतेक शाळा मनमानी पद्धतीने दरवर्षी शुल्कवाढ करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे प्रवेश शुल्क घेण्यास बंदी असतानाही सर्रासपणे १० हजार रुपयांपासून ५५ हजार रुपयांपर्यंत प्रवेश शुल्काची आकारणी होत आहे. याशिवाय बाजारभावाच्या तुलनेत दुप्पट किमतीने शालेय वस्तूंची खरेदी शाळा प्रशासनाकडूनच करण्याची सक्ती केली जात आहे. शाळा प्रशासनाच्या या आर्थिक शोषणाला विरोध करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शाळेतून काढण्याची लेखी नोटीस देण्यात येते. त्यामुळे आता केंद्राच्या कक्षेत असलेल्या या शाळांवर राज्य सरकार कोणती आणि कशा प्रकारे कारवाई करणार, असा सवालही पालकांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)