Join us

गोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 8:53 PM

Mumbai : अखेर पालकांनी फी वाढीच्या निर्णया विरोधात एल्गार पुकारत व संघटीत होत यशोधाम शाळेच्या समोर मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन केले.

ठळक मुद्देशिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू व जोगेश्वरी येथील शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले याचा कोणताही फायदा झाला नाही.

मुंबई :  गोरेगाव (पूर्व ) दिंडोशी येथील यशोधाम शाळेने विद्यार्थ्यांना कोरोना काळात फी भरण्यासाठी वेठीस धरु नये आणि नवीन फी वाढ करु नये, या मागणीसाठी नुकतेच येथील पालकांनी एकत्र येऊन आंदोलन करत आपला जोरदार विरोध दर्शविला. मात्र, शाळा प्रशासनाने यावर हा विषय हायकोर्टात आहे, तो निकाल आल्यावर आम्ही निर्णय घेऊ, असे सांगितले. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगात आर्थिक मंदीचे सावट आले. लोकांच्या नोकऱ्या गेल्या समाजातील प्रत्येक घटकावर लॉकडाउनचा विपरीत परिणाम झाला असून यात विद्यार्थी देखील सुटले नाही. शिक्षण पद्धतीवर बदल होऊन ऑनलाईन शिक्षण प्रणाली स्वीकारली गेली. मात्र, हे सगळं होत असतांना काही खाजगी शाळांनी राज्य सरकारने पालकांकडून फी घेऊ नये या आवाहनाला न जुमानता विद्यार्थी व पालक यांना वेठीस धरले आहे.

गोरेगावच्या यशोधाम शाळेने देखील विद्यार्थी व पालकांना फी भरण्यासंदर्भात तगादा लावत दोघांचेही मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. तसेच शाळेने न थांबता वर्ष  2021 ते 2022 या वर्षात फी वाढीचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे या शाळा प्रशासनाविरोधात पालकांनी एकत्र येऊन सह्यांची मोहीम सुरू केली. मात्र, याचा कोणताच परिणाम झाला नाही. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू व जोगेश्वरी येथील शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले याचा कोणताही फायदा झाला नाही.

अखेर पालकांनी फी वाढीच्या निर्णया विरोधात एल्गार पुकारत व संघटीत होत यशोधाम शाळेच्या समोर मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन केले. या वेळी एक निवेदन शाळा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी हायकोर्टाच्या निर्णया नंतर आम्ही आपणास आमचा निर्णय कळवू असे येथील पालकांना शाळा प्रशासनाने सांगितले. याप्रकरणी मुंबईचे उपमहापौर अॅड. सुहास वाडकर यांनी आंदोलनकर्त्यां पालकांना भेटून त्यांचाकडून प्रकरणाची माहिती घेत लवकरात लवकर आपण शिक्षण अधिकाऱ्यांना भेटून या विषयाबाबत काय मार्ग काढता येईल ते पाहू असे आश्वासन दिले.

टॅग्स :मुंबईशिक्षण