ऑनलाइन शिक्षणात पालकच होत आहेत मुलांचे शिक्षक..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:09 AM2021-08-28T04:09:32+5:302021-08-28T04:09:32+5:30
सीमा महांगडे मुंबई : कोविड संसर्गामुळे राज्यातील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ऑनलाइन मार्ग स्वीकारावा लागत आहे. शाळा ...
सीमा महांगडे
मुंबई : कोविड संसर्गामुळे राज्यातील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ऑनलाइन मार्ग स्वीकारावा लागत आहे. शाळा प्रत्यक्षात सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असली तरी ऑनलाइन लर्निंग संसाधनांच्या साहाय्याने आभासी शिक्षणाच्या हायब्रिड मॉडेलबद्दल पालक समाधानी आहेत का, असे एका सर्वेक्षणातून पालकांना विचारल्यास ६४ टक्के पालकांनी होकारार्थी उत्तर दिले. विशेष म्हणजे या ऑनलाइन शिकवणीत पालक-शिक्षक आणि मार्गदर्शक अशी दुहेरी भूमिका बजावत असल्याचे समोर आले आहे.
ब्रेनली या संस्थेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार पालक ऑनलाइन क्लासदरम्यान ३१ टक्के पालक मुलांना मदत करतात, तर गृहपाठासाठी २२ टक्के आणि प्रयोगशील पद्धतीने शिकवणीत १६ टक्के पालक विद्यार्थ्यांना मदत करत असल्याचे समोर आले आहे.
शिक्षण आणि कौशल्य विकासावर भर
स्मार्टफोन आणि इंटरनेटवर मुले केवळ मनोरंजनासाठी वेळ घालवतात, असे पूर्वी मानले जात होते. नव्या ट्रेंडनुसार असे दिसते की, मनोरंजनात्मक गोष्टींसोबतच, शिक्षण आणि कौशल्ये वाढविण्यासाठी मुले डिजिटल डिव्हाइस आणि इंटरनेटचा वापर करतात, हे वास्तव पालक सहजपणे स्वीकारत असल्याचे समोर आले आहे. तसेच ६० टक्के विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणातील पालकांचा सहभाग वाढविला असल्याचे मत नोंदविले आहे.
शिक्षण प्रक्रियेत पालकांचा सहभाग
अभ्यासाव्यतिरिक्त पालक आपल्याला मानसिक आणि भावनिक आधार देणे, शंका आणि प्रश्नांची उत्तरे देणे, विविध उपक्रमांमध्ये मदत करणे अशा गोष्टींत ही मदत करत असल्याचे मत ८ टक्के विद्यार्थी नोंदवित आहेत. अभ्यास करताना विशेषतः गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषयांत पालकांची मदत लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे.
कोट
याआधी पालक शाळांतील सहामाही, वार्षिक बैठक, कार्यक्रम, वार्षिक संमेलन अशा उपक्रमांना हजेरी लावत असत. मात्र ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक पालक मुलांच्या शिक्षणाचा प्रवास जवळून पाहू शकले आहेत. ऑनलाइन शिकवण्यांमुळे अनेक पालकांनी विद्यार्थ्यांच्या समस्या अडचणी जाणून घेण्यात मदत केली आहे. तसेच त्यांचा मुलांच्या शिक्षणातील सहभाग ही वाढविण्यास मदत केली आहे.
राजेश बिसाणी, मुख्य उत्पादन अधिकारी (सीपीओ) ब्रेनली