मुंबई : अंतर्गत गुण कमी केल्याचा फटका दहावीच्या राज्य मंडळाच्या निकालाला लागला आणि त्यात मोठी घसरण झाली. या पार्श्वभूमीवर सीबीएसई व आयसीएसई या विद्यार्थ्यांना त्यांच्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीत प्रवेश देण्यात यावा, या प्रस्तावावर आपण चर्चा करू, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले. मात्र त्यांच्या या धोरणाला सीबीएसई, आयसीएसई शाळा, मुख्याध्यापक, विद्यार्थी - पालक यांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे.
शिक्षणमंत्र्यांचा हा विचार धोरणात्मक नसून सीबीएसई, आयसीएसई पालकांच्या विरोधात जाणार असल्याची प्रतिक्रिया इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनच्या सदस्या अनुभा सहाय्य यांनी दिली. विनोद तावडे हे राज्याचे शिक्षणमंत्री असून सीबीएसई आणि आयसीएसई मंडळांची धोरणे काय आणि कशी असावीत याचा अधिकार त्यांना नसल्याचेही त्यांनी म्हटले. त्यामुळे आम्ही या प्रस्तावाचा तीव्र निषेध करत असल्याचे त्यांनी म्हटले. सीबीएसई शाळेतील मुख्याध्यापक व पालक यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. शिक्षणमंत्र्यांचे धोरण कायदेशीर ठरू शकणार नाही. त्यांच्या या वक्तव्यावर कायदेशीर आव्हान देता येऊ शकते. एकप्रकारे हा मुलांवर करण्यात आलेला अन्याय आहे. त्यांची पुढील शैक्षणिक वाटचाल किंबहुना त्यांचे भवितव्य यामुळे धोक्यात येणार आहे. निकाल लागल्यानंतर केवळ राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी इतर बोर्डातील मुलांच्या गुणवत्ता बदल करणे सयुक्तिक होणार नाही. वर्षभर अभ्यास करून व विविध प्रकल्प सादर करत आम्ही गुण प्राप्त केले आहेत. या परिश्रमाला, अभ्यासावर अविश्वास दाखवणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अविश्वास व्यक्त करणे होय. शैक्षणिक ध्येय-धोरणे इतकी लवचीक असता कामा नयेत. शैक्षणिक मसुदा तयार करताना भविष्यातील तरतुदींचा विचार करून केल्यास आजच्यासारखी प्रवेशाची बिकट अवस्था निर्माण होणार नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी सदस्य उदय नरे यांनी दिली.अकरावीच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा; प्रवेशाच्या भाग एकसाठी दीड लाख अर्जदहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकाबाबतची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली आहे. ्रप्रवेश अर्जाचा भाग-२ भरणे, अर्जांची तपासणी करणे, प्रवेश फेऱ्यांची यादी जाहीर करणे, प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याची मुदत यांच्या तपशिलाचा समावेश असलेले प्रवेशाचे वेळापत्रक येत्या २ दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत अकरावी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या भाग-१ साठी १ लाख ६५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असल्याची माहिती उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.