आई-वडील रोजंदारीवर, मुलगा ‘एमपीएससी’चा वारकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 06:35 AM2021-03-12T06:35:29+5:302021-03-12T06:35:39+5:30

पालकांच्या कष्टाची वेदना : परीक्षेबाबतच्या अनिश्चिततेमुळे भविष्याबाबत अंधार

Parents are on wages, son is a Warkari of MPSC | आई-वडील रोजंदारीवर, मुलगा ‘एमपीएससी’चा वारकरी

आई-वडील रोजंदारीवर, मुलगा ‘एमपीएससी’चा वारकरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी गेल्या अनेक महिन्यांपासून कष्ट घेत आहेत. मात्र ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची बातमी गुरुवारी पुढे आली आणि यातल्या अनेकांच्या डोळ्यासमोर काजवेच चमकले. कारण पुण्यासारख्या शहरात राहून एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांचे पालक गावाकडे रोजंदारी करून, मोलमजुरी करून त्यांना शिकवत आहेत. परीक्षा रद्द झाल्याचे समजताच विद्यार्थी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले त्यामागे त्यांच्या आई-वडिलांच्या कष्टाची वेदना मोठ्या प्रमाणात आहे.  

दिवसभर अभ्यासिकेतला अभ्यास आणि रात्री नोकरी हे गेल्या दोन वर्षांचे आशिष पवारचे ‘रुटीन’ आहे. २३ वर्षांचा आशिष पवार यवतमाळचा. त्याचे पालक मोलमजुरी करतात. त्यातून त्यांचा स्वत:चाच खर्च भागवताना त्यांच्या नाकीनऊ येते. त्यामुळे पुण्यात राहायला आलेल्या आशिषला स्वत:चा खर्च स्वत: भागवावा लागतो. त्यासाठी दिवसभर अभ्यास आणि रात्री वाॅचमनची नोकरी करत तो महिन्याकाठी ८ ते १० हजारांची जुळणी कशीतरी करतो. पुस्तक खरेदी किंवा इतर काही खर्च आला की हे गणित कोलमडते. 

आशिषने ‘लोकमत’ला सांगितले की,“दोन वर्षे परीक्षाच झाली नाही. काय करावे ते कळत नाही. घरच्यांना माहितीये की मुलगा परीक्षा द्यायला पुण्याला गेलाय. पण पुण्यात राहूनही मुलाला परीक्षा का देता आली नाही, हे त्यांना कुठे माहीत आहे?”  
आशिषसारखीच अवस्था नांदेडच्या २३ वर्षांच्या सम्यक कोकरेची. सम्यक सांगतो, “आई-वडील रोजंदारीवर जातात. पोटाला चिमटा घेऊन माझ्यासाठी पैसे पाठवितात. एक वर्ष त्यांनी मदत केली. मग कोरोना आला. आता परीक्षाच नाही.”  

हजारो विद्यार्थ्यांची हीच कहाणी...
अशीच अवस्था कमी-अधिक फरकाने सगळ्याच विद्यार्थ्यांची.  मग एवढे असून ‘एमपीएससी’चे आकर्षण का, असे विचारल्यावर कोल्हापूरचा एक विद्यार्थी म्हणाला,“घरची शेती आहे. शेतीमधली दुरवस्था बघितल्यानंतर शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. शिक्षण संपल्यावर नोकरी मिळेना म्हणून एमपीएससीकडे वळलो.” हजारो विद्यार्थ्यांची हीच कहाणी. त्यामुळे सगळा वेळ, आई-वडिलांचे कष्ट, वय, पैसा वाया जाणार का, ही चिंता हजारो विद्यार्थ्यांना सतावते आहे.   

Web Title: Parents are on wages, son is a Warkari of MPSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.