मुंबई : लहान मुले काय करामती करतील, याचा काही नेम नाही. असाच प्रकार नांदेडमधील एका गावातील नऊ महिन्यांच्या बाळाने केला. त्याने चक्क जीवघेणा सेल गिळाल्यामुळे पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. स्थानिक डॉक्टरांकडे उपचार केले. मात्र, यश आले नाही. अखेर पालकांनी मुंबई गाठली आणि सायन रुग्णालयातील व्हिजिटींग फॅकल्टी असणाऱ्या डॉ. कैलाश कोल्हे यांच्याकडे बाळाला नेले. येथे एन्डोस्कोपीद्वारे सेल बाहेर काढण्यात डॉक्टरांच्या चमूला यश आले.
आई- वडील शेतावर गेले असताना नऊ महिन्यांच्या बाळाने सेल गिळताना मोठ्या भावाने पाहिले आणि त्वरित पालकांना सांगितले. पालकांनी धाव घेत डॉक्टरांकडे नेले. मानवी शरीराकरिता सेल अत्यंत घातक असतो, त्यातील ॲसिड जीवघेणे असते. बाळाचे वय पाहता हा सेल काढणे अत्यंत धोकादायक आणि आव्हानात्मक होते. कारण, आतड्यांना छिद्र करून सेल आतमध्ये गेल्यास धोका आणखीन वाढणार होता, अशी माहिती बाळावर उपचार करणाऱ्या डॉ. कैलाश कोल्हे यांनी दिली.
एन्डोस्कोपी करताना हा सेल जठर आणि आतड्यांच्या भागात फिरत असल्याचे दिसून आले. बाळाचे वय लक्षात घेऊन शस्त्रक्रिया न करता एन्डोस्कोपीच्या पर्यायाचा विचार केला गेला. मात्र, ही प्रक्रिया करताना त्यापूर्वी बाळाला दूध देण्यात आले होते. दूध पोटात गेल्यावर घट्ट होते, त्यामुळे सेल शोधताना अडचण निर्माण झाली. मात्र, संयमाने काही काळ शोधल्यानंतर चमकलेली वस्तूसदृश्य काहीसे दिसेल, तो सेलच होता. त्यामुळे कुठलीही इजा न करता हा सेल बाहेर काढण्यात आला, असे डॉ. कोल्हे यांनी नमूद केले.
या वस्तूंपासून सावध राहण्याची गरजलहान मुले कोणतीही वस्तू तोंडात टाकण्याची प्रकरणे डॉक्टरांकडे येत असतात. बाळांनी बटण, बाटलीचे झाकण, मंगळसूत्र गिळल्याची प्रकरणे समोर आल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. यात प्लास्टिक बाटलीचा झाकणाचा काही भाग गिळल्याचे प्रकरणदेखील आव्हानात्मक होते. यात ते झाकण प्लास्टिकचे असल्याने एक्सरेमध्ये दिसून येत नव्हते. तरीही ते झाकण बाहेर काढण्यात यश मिळाले, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
अनेकदा घरांमध्ये लहान मुले असूनही त्यांच्या हालचालींकडे लक्ष दिले जात नाही. याबाबत, पालकांनीच नव्हे तर घरातील सर्वांनीच अधिक खबरदारी बाळगली पाहिजे. लहान मुला- मुलींना समोर दिसेल ती वस्तू तोंडात टाकण्याची सवय असते. त्यामुळे पालकांनी अशा वस्तू बाळांपर्यंत पोहोचणार नाही, याची काळजी घ्यायला पाहिजे.- डॉ. कैलाश कोल्हे,व्हिजिटींंग फॅकल्टी, सायन रुग्णालय