Join us

‘त्या’ बाळाच्या पालकांची न्यायालयात धाव, पोलिसांकडून चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 4:43 AM

शनिवारी रुग्णालय प्रशासनानेही पांचाळ यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात अर्ज दिला असून, आता या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

मुंबई : गर्भामध्ये बाळाला असलेले व्यंग वेळीच निदान न केल्यामुळे परळच्या अमित आणि श्रुतिका पांचाळ यांची नवजातमुलगी गेले ४३ दिवस अतिदक्षता कक्षात उपचार घेते आहे. या प्रकरणात परळच्या वाडीया रुग्णालयाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप करीत, पांचाळ दाम्पत्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यानंतर, शनिवारी रुग्णालय प्रशासनानेही पांचाळ यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात अर्ज दिला असून, आता या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. आता पांचाळ दाम्पत्य लवकरच या प्रकरणात न्याय मागण्यासाठी न्यायालयात धाव घेणार आहे.भोईवाडा परिसरात राहणाऱ्या पांचाळ दाम्पत्यांना पाच वर्षांनंतर कन्या प्राप्ती झाली. गर्भावस्थेतील सर्व औषधोपचार वाडीया रुग्णालयात घेण्यात आले. त्यानंतर, आठव्या महिन्यात बाळाच्या मेंदूला सूज असल्याचे सांगत, त्वरित प्रसूती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार, २८ मार्चला प्रसूती झाली. परंतु बाळाचे दोन्ही पाय निकामी असल्याचे डॉक्टारांनी सांगितले.याविषयी अधिक माहिती देताना अमितचे भाऊ प्रकाश पांचाळयांनी सांगितले की, गर्भातील बाळातील व्यंग निदर्शनास आणणारी अ‍ॅनोमॅलिस चाचणी न केल्याने बाळामधील व्यंग वेळेत समजू शकलेले नाही. जन्मत:च बाळाच्या मेंदूमध्ये पाणी झाले असून, तसेच या बाळाचा स्पाइन बिफिडा म्हणजेच मज्जारज्जू आणि पाठीचा मणका जोडलेले नाहीत हा दोष आहे. त्या लहानगीच्या मज्जारुज्जूंवर आठ दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली असून, तिच्या मेंदूमधीलपाणी शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात येणार आहे. मात्र, रुग्णालय प्रशासन स्थानिक राजकारण्यांमार्फत प्रकरण दाबण्यासाठी दबावआणत आहे, पण न्यायलयीन संघर्ष करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.‘आरोपांमध्ये तथ्य नाही’रुग्णालय प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा केलेला नाही, या आरोपांमध्ये तथ्य नाही. या प्रकरणी अमित पांचाळ रोज रुग्णालयातील वातावरण गढूळ करत आहे. त्यांच्या पत्नी श्रुतिका यांना एक महिन्यापूर्वी डिस्चार्ज देऊनही त्या अजूनही घरी गेलेल्या नाहीत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने आता पांचाळ यांना रोखण्यासाठी भोईवाडा पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे, अशी माहिती वाडीया रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :न्यायालय