मुंबई : अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीत आवडते महाविद्यालय न मिळाल्याने काही पालकांनी शुक्रवारी दुपारी उपसंचालक कार्यालयाबाहेर गोंधळ घातला. कोणत्याही परिस्थितीमध्ये पाल्याला आवडत्या महाविद्यालयात प्रवेश द्याच, असा बालहट्ट करत काही पालकांनी नाराजी व्यक्त केली.महत्त्वाची बाब म्हणजे काही विद्यार्थ्यांना आवडते महाविद्यालय मिळाल्यानंतरही आवडता विषय मिळाला नसल्याची तक्रार काही पालक करत होते. संबंधित विषयासाठी खाजही क्लासेसमध्ये फी भरल्याचेही पालकांनी सांगितले. त्यामुळे आवडते महाविद्यालय मिळाल्यानंतर संबंधित विषयाची मागणीही काही पालक करत होते. याउलट पहिल्या पाच पसंतीक्रमामधील महाविद्यालय मिळाल्यानंतरही काही विद्यार्थी आणि पालक नाराज दिसले. याबाबत विचारणा केली असता, घरापासून थोडे आणखी जवळ महाविद्यालय हवे असल्याची त्यांची तक्रार होती.धक्कादायक बाब म्हणजे पालकांसोबत काही दलालही याठिकाणी दिसले. विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करून चिथावणी देण्याचे काम ते करत होते. काही पालकांनी आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना हजारो रुपये दिल्याचेही मान्य केले. शिवाय काही महाविद्यालयांत अद्याप जागा रिक्त ठेवण्यात आल्या असून, पैसे भरल्याने त्याच महाविद्यालयात प्रवेश देण्याची मागणी होत होती. (प्रतिनिधी)पालकांकडून आत्महत्येची धमकीविद्यार्थ्यांना आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी हजारो रुपये देण्याची तयारी पालकांनी दाखवली. मात्र प्रवेश मिळाला नाही, तर पाल्य आत्महत्या करतील, अशी धमकीही पालक देत होते. त्यामुळे पाल्यांची समजूत काढण्याऐवजी आत्महत्येची धमकी देऊन प्रवेशाचा बालहट्ट धरणाऱ्या पालकांना कसे समजवायचे, असा सवाल उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना पडला होता.
प्रवेशासाठी पालकांचा बालहट्ट सुटेना!
By admin | Published: August 13, 2016 4:21 AM