Join us

पालक घालणार शिक्षणमंत्र्यांना साकडे

By admin | Published: May 02, 2017 5:07 AM

खासगी शाळांमध्ये सुरू असलेल्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी तक्रार करा, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले,

मुंबई : खासगी शाळांमध्ये सुरू असलेल्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी तक्रार करा, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले, पण आधी केलेल्या तक्रारींवर कोणतीही कारवाई होत नसल्याने पालक आता संतप्त झाले आहेत. खासगी शाळांत दरवर्षी करण्यात येणाऱ्या शुल्कवाढी संदर्भात पालक एकत्रित होऊन शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार आहेत. शुल्कवाढीविरोधात काही दिवसांपूर्वी पालक एकत्र आले होते. त्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अतिरिक्त शुल्कवाढ करणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते, पण त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. शुल्कवाढ करताना ‘पेरेंट टीचर्स असोसिएशन’ची (पीटीए) बैठक होणे आवश्यक असते. त्यानंतर, या बैठकीत मान्यता मिळाल्यावर शुल्कवाढ केली जाते. दरवर्षी शाळांना शुल्कवाढ करण्यास परवानगी नाही, तरीही या नियमाची पायमल्ली होते. खासगी शाळांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाकडे या आधी अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत, पण या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. खासगी शाळांमध्ये शुल्कवाढीचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. दरवर्षी होणाऱ्या या शुल्कवाढीचा फटका पालकांना मोठ्या प्रमाणात बसत आहेत, पण या विरोधात शाळांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. शिक्षण विभागाला अनेकदा पत्रे लिहिली आहेत, पण त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे पालक प्रसाद तुळसकर यांनी सांगितले. तुळसकर पुढे म्हणाले, अनेक पालकांनी एकत्र येऊन तक्रारी केल्या आहेत, पण या खासगी शाळांकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करतो. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे पत्र पाठवण्यात आले आहे, पण तरीही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. तावडे यांची भेट घेणार असून, मनमानी कारभाराला आळा घालण्याची मागणी करणार आहोत. शुल्कवाढीवर नियंत्रण आणल्यास सर्व पालकांना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)