महापालिकेच्या इंग्रजी शाळांकडे मुंबईत पालकांचा वाढता कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:40 IST2024-12-27T13:39:54+5:302024-12-27T13:40:01+5:30
नवीन वर्षासाठी प्रवेश सुरू : गतवर्षी १० हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश

महापालिकेच्या इंग्रजी शाळांकडे मुंबईत पालकांचा वाढता कल
मुंबई : मुंबईतील महापालिका लोकमत न्यूज नेटवर्क शाळांमध्ये मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा ओढा असून, त्यासाठी महापालिकेने यंदाही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. पालिकेच्या या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये गतवर्षी १० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी रमेश कंकाळ यांनी दिली.
मुंबईतील पालिकेच्या मराठी आणि हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये पटसंख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या पालकाचीही आपल्या मुलाने इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यावे, अशी अपेक्षा असते. त्यानुसार पालिकेने मुंबईत सीबीएससी बोर्डाच्या १८ शाळा, तर आयबी आणि आयसीएसई तसेच आयजीसीएसई या बोर्डाची प्रत्येकी एक शाळा सुरू केली आहे.
पालिकेच्या सर्व माध्यमांच्या एकूण एक हजार १४८ शाळा मुंबईत आहेत. या शाळांमधून तीन लाख ४७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; मात्र आता अन्य बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. यावर्षी ही प्रक्रिया १ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान सुरू राहणार आहे. त्यामुळे या २१ शाळांमध्ये प्रवेश नोंदवण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कंकाळ यांनी केले आहे.
सीबीएसई बोर्डासाठी सर्वाधिक अॅडमिशन
पालिकेने अन्य बोर्डाच्या सुरु केलेल्या शाळांमध्ये गतवर्षी सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये नर्सरी ते सहावीपर्यंत १० हजार ३७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
आयसीएसई बोर्डाच्या शाळेत २३० विद्यार्थ्यांनी नर्सरीच्या वर्गात प्रवेश घेतला. आयबी बोर्डाच्या शाळेत नर्सरीमध्ये ७८ विद्यार्थ्यांनी, तर आयजीसीएसई बोर्डाच्या शाळेत नर्सरीमध्ये १७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला होता. एकूण १० हजार ८०७ विद्यार्थ्यांनी या शाळांमध्ये प्रवेश नोंदवला होता. एकूण १० हजार ८०७ विद्यार्थ्यांनी या शाळांमध्ये प्रवेश घेतला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी कंकाळ यांनी दिली. यंदाही सुरू केलेल्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेलाही निश्चितच प्रतिसाद मिळेल, त्यामुळे १५ जानेवारीनंतरच किती विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला हे स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.