अनोळखी मैत्री पडू शकते महागात, सायबर पोलिसांचे आवाहन
सायबर पोलिसांचे आवाहन, अनोळखी मैत्री पडू शकते महागात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समाजमाध्यमांवर अल्पवयीन मुलांसोबत मैत्री करायची. पुढे त्यांचे अर्धनग्न फोटो, व्हिडिओ शेअर होताच, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्याच्या घटना डोके वर काढत आहे. अशात, पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. याबाबत त्यांनी एक नियमावलीही जारी केली आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्राम अकाउंटवर अल्पवयीन मुला-मुलींना अनोळखी व्यक्तीकडून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात येत आहे. ही मंडळी मैत्रीचा गैरफायदा घेत त्यांचे अश्लील फोटो मिळवतात. पुढे हेच फोटो पालक, नातेवाईक तसेच समाजमाध्यमांवर शेअर करण्याच्या नावाखाली धमकावत आहे. त्यामुळे ‘‘पालकांनी आपला पाल्य काय करतो, कुणाशी बोलतो यावर लक्ष ठेवण्याबरोबरच अल्पवयीन मुला-मुलींनीही आपली गोपनीय माहिती कुणाला शेअर करू नका. अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, तसेच कुणालाही आपले फोटो शेअर करू नका शिवाय आपले अकाउंट प्रायव्हेट ठेवण्याचे’’ आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.