पालकांना ऑनलाइन शिक्षण हवे, केवळ दोन तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 01:23 AM2020-06-24T01:23:27+5:302020-06-24T01:23:32+5:30
ऑनलाईन शिक्षण द्यायला हवे परंतु, ते दोन तासांपेक्षा जास्त वेळ नसावे असे मत बहुसंख्य पालकांनी व्यक्त केले आहे.
मुंबई : लहानग्यांना ऑनलाइन शिक्षणाची सक्ती करावी का, या मद्यावरून वादंग उभा ठाकला असताना पाचवीपर्यंतच्या विद्यार्थांना आॅनलाईन शिक्षण द्यायला हवे परंतु, ते दोन तासांपेक्षा जास्त वेळ नसावे असे मत बहुसंख्य पालकांनी व्यक्त केले आहे. ३१ टक्के पालकांनी अशा पध्दतीच्या शिक्षणाला विरोध केला आहे. तर, १५ टक्के पालकांना शाळेच्या दैनंदिन वेळापत्रकानुसार आॅनलाइन शिक्षण द्यावे असे वाटत आहे. लोकल सर्कल या आॅनलाइन सर्वेक्षण करणाऱ्या देशातील नामांकित संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही मते व्यक्त करण्यात आली आहेत.
६४ टक्के पालकांचा आॅनलाइन शिक्षणाला विरोध नाही. मात्र, ते दोन तासांपेक्षा जास्त नसावे असे त्यापैकी ४८ टक्के पालकांचे म्हणणे आहे. काही राज्यांनी प्राथमिक शिक्षणासाठी आॅनलाइन पर्याय उपयुक्त नसल्याचे स्पष्ट करत अशा पध्दतीच्या शिक्षणावर बंदी घातली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर परिणाम होतील या भीतीपासून ते गरीब विद्यार्थी अशा पध्दतीच्या शिक्षणापासून वंचित राहतील ही काळजीसुध्दा आहे. अनेक मध्यमवर्गीय पालकांना या शिक्षणासाठी लागणारे लॅपटॉप, टॅब, मोबाईल फोन, इंटरनेट जोडण्या घेणेही शक्य नाही. त्यामुळेसुध्दा या शिक्षणाला विरोध होत आहे.