पालकांनो मुलांची काळजी घ्या!
By admin | Published: August 8, 2015 01:02 AM2015-08-08T01:02:09+5:302015-08-08T01:02:09+5:30
‘पालकांनो आपल्या मुलांना जपा’, असे खास आवाहन मुंबई रेल्वे पोलिसांकडून पालकांना करण्यात आले आहे. पालकांपासून दुरावलेल्या आणि हरवलेल्या १८ वर्षांखालील बालकांचा
मुंबई : ‘पालकांनो आपल्या मुलांना जपा’, असे खास आवाहन मुंबई रेल्वे पोलिसांकडून पालकांना करण्यात आले आहे. पालकांपासून दुरावलेल्या आणि हरवलेल्या १८ वर्षांखालील बालकांचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी-गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस) ‘आॅपरेशन मुस्कान’ ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती. १ ते ३१ जुलैपर्यंत राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल १ हजार १५२ मुलांचा शोध घेण्यात आला. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई सेंट्रलमध्ये सर्वाधिक ३१६ मुले-मुली सापडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर गर्दीची स्थानके असलेल्या सीएसटी आणि दादर स्थानकांचा नंबर लागला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मुले सापडल्याने रेल्वे पालीसही अवाक् झाले आहेत.
पालकांपासून दुरावलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने विशेष मोहीम एक महिनाभर राबवण्याचा निर्णय घेत तशा सूचनाच देशभरातील रेल्वे पोलिसांना केल्या. गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार १ जुलैपासून ‘आॅपरेशन मुस्कान’ नावाने ही मोहीम मुंबई विभागातील रेल्वे पोलिसांकडून सुरू करण्यात आली होती. या ‘आॅपरेशन मुस्कान’मध्ये पाच वर्षांत हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यात आला. मात्र यात २४ तासांत तसेच दोन ते तीन दिवसांत हरवलेल्या सर्वाधिक मुलांचा शोध घेण्यात आला. सुरुवातीच्या बारा दिवसांतच या मोहिमेत रेल्वे पोलिसांनी तब्बल ४९२ मुला-मुलींचा शोध घेतला. आता ३१ जुलैपर्यंत रेल्वे पोलिसांनी ही मोहीम यशस्वीरीत्या राबवत महिनाभरात तब्बल १,१५२ मुला-मुलींचा शोध लावल्याचे सांगण्यात आले. यातील १९८ मुले-मुली बालसुधारगृहात पाठवण्यात आली, तर ९५४ जणांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे या एक महिनाभर चाललेल्या मोहिमेत मुंबई सेंट्रल स्थानक आणि टर्मिनसमध्ये तब्बल ३१६ मुले-मुलींचा शोध घेण्यात आला. यामध्ये २४३ मुलांचा तर ७३ मुलींचा समावेश आहे. त्यानंतर सीएसटी स्थानकात १४६ मुले आणि २२ मुलींचा तर दादर स्थानकात १0४ मुले आणि ६0 मुलींचा शोध घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. चर्चगेट, अंधेरी, पनवेल, वाशी या स्थानकातही सर्वाधिक मुले-मुली सापडल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली. या शोधमोहिमेसाठी सर्व रेल्वे पोलीस ठाण्यांतील बाल पोलीस पथकातील अधिकारी, कर्मचारी यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.