मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्यां लाटेत वयोवृद्धांपेक्षा बाधित होणाऱ्या तरूणांची संख्या लक्षणीय आहे. तर आता राष्ट्रीय पातळीवर सरकारी यंत्रणेसह विविध वैद्यकीय अहवालानुसार, करोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. या अनुषंगाने पोस्ट कोरोना स्थितीत असणाऱ्या लहानग्यांना जपण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
या आजारात करोना संसर्गातून बरे झाल्यानंतर बालकांमध्ये शरीरातील विविध अवयवांवर सूज येऊन हात-पायाची हाडे, डोळे या अवयवांसह हृदयावर दुष्परिणाम होत असल्याचे आढळले. हृदयावर सूज येऊन, हृदयात, शरीरात रक्ताच्या गाठी तयार होणे, अशी लक्षणे आढळतात. या आजारावरील उपचार महागडे असल्याने पालकांनी वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. वय आणि वजनानुसार बालरुग्णांवर आयव्ही-आयजी (इंन्टौव्हिनस इम्युनोग्लोब्युलीन) चे उपचार केले जातात, असे त्या म्हणाले. या आजाराची लक्षणे साधारणपणे दिसून येत नाही, त्यामुळे याविषयी पालकांनी अधिक सजगपणे लक्ष दिले पाहिजे, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. शुभांगी पाटील यांनी दिली आहे.
सध्या २० पॉझिटिव्ह रुग्ण उपचाराधीन
शहर उपनगरातील कोविड केंद्र आणि रुग्णालयात सध्या २० बाल कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती पालिकेने दिली. यापूर्वी, आतापर्यंत नवजात बालक ते ९ वर्षांपर्यंतच्या १३ हजार ४०६ बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, या वयोगटातील २० रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. तर १० ते १९ वयोगटातील ३४ हजार ३५७ बालकांना संसर्ग झाला असून यात ४१ मृत्यू झाले आहेत.
काळजी घेण्याचे आवाहन
बालकांना किंवा घरात पालकांना करोना होऊन गेला असल्यास या वयोगटातील बालकांची पालकांनी विशेष काळजी घ्यावी. वेळीच निदान व योग्य उपचार झाल्यास हा आजार घाबरण्यासारखा नसल्याने त्यामुळे पालकांनी लहान बालकांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
नियमित वैद्यकीय तपासणी आवश्यक
करोनाबाधित बालकांना तसेच कोविडचे प्रतिपिंड तयार झालेल्या बालकांमध्ये मल्टिसिस्टम इन्फ्लोमेटरी सिंड्रोम म्हणजेच पोस्ट कोविड (एमआयएससी) या आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळून आली आहेत. कावासाकी सिंड्रोम हा असा आजार आहे, ज्यामुळे रक्तवाहिन्या, हृदय आणि अन्य अवयवांवर दुष्परिणाम जाणवतात. तीव्र ताप, लो ब्लडप्रेशर आणि श्वास घेण्यात अडथळे येणे ही या आजाराची सामान्य लक्षणे आहेत, त्यामुळे या बालकांवर लक्ष ठेऊन त्यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडे सातत्याने पाठपुराव करणे गरजेचे आहे.