Join us

पालकांचे टेन्शन वाढले, निकालास विलंब हाेणार? संपामुळे उत्तरपत्रिका तपासण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 6:05 AM

शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीसाठी स्वीकारले नसल्याने विद्यार्थी व पालकांचे टेन्शन वाढले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) कर्मचाऱ्यांनी एकीकडे काळ्या फिती लावून काम केले, तर दुसरीकडे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या प्राचार्य, शिक्षकांनीही परीक्षांच्या कामात सहभाग घेतला. मात्र शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीसाठी स्वीकारले नसल्याने विद्यार्थी व पालकांचे टेन्शन वाढले आहे.

राज्यातील सरकारी-निम सरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना व इतर मागण्यांसाठी आजपासून सुरू केलेल्या बेमुदत संपात जवळपास ८० टक्के  कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी सहभाग घेतला. सुमारे ५० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक सोमवारपासून बेमुदत संपावर गेले असून उर्वरित शिक्षकही लवकरच या संपात सहभागी होतील, असा विश्वास महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी व्यक्त केला आहे. 

जुनी पेन्शन योजना मान्य केल्याशिवाय हा संप मागे घेतला जाणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. विद्यार्थी हितासाठी परीक्षांच्या कामात शिक्षक सहभागी होत असले तरी उत्तरपत्रिका तपासणीवर त्यांनी बहिष्कार घातला असल्याचे आंधळकर यांनी स्पष्ट केले.

मुंबईत संपादरम्यान शिक्षकांची निदर्शने 

- मुंबईत संपात सहभागी झालेल्या शिक्षक, प्राचार्य व कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. - मुंबईतील झुनझुनवाला, के. जे. सोमैया, बुऱ्हाणी महाविद्यालय येथे निदर्शने करण्यात आली. - चेंबूर शिक्षक निरीक्षक कार्यालयासमोर शेकडो शिक्षकांनी आंदोलन केले. - मुंबई मराठी अध्यापक संघ, शिक्षक भारती आदी संघटनांनी आंदोलनात भाग घेतला.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने निदर्शने व धरणे आंदोलन केले. शासनाने पेन्शनचा विषय निकाली काढावा, अन्यथा दहावीचे पुढील पेपर प्रभावित होतील. शिवाय दहावी, बारावी उत्तरपत्रिका व निकालावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ दखल घ्यावी. - शिवनाथ दराडे, मुंबई कार्यवाह, राज्य शिक्षक परिषद

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :संपशिक्षक