Join us

मराठी शाळांकडे वाढतोय पालकांचा कल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 4:25 AM

आई नेटवर्क इंजिनीअर आणि वडील मोठ्या कंपनीत मॅनेजर पदावर काम करीत असतानाही प्रांजलच्या पालकांनी फेसबुक समूहाने प्रेरित होऊन सीबीएसई

सीमा महांगडेमुंबई : मातृभाषेतून शिक्षण मिळाले पाहिजे आणि त्यासाठी मराठीशाळा टिकल्या पाहिजेत यासाठी सुरू झालेल्या मराठीशाळा फेसबुकच्या चळवळीला सर्व स्तरांतून पाठिंबा वाढत आहे. या समूहाचे सदस्य असलेल्यांवरही या चळवळीचा सकारात्मक परिणाम होत असून पालक असलेले सदस्य आपल्या मुलांचा प्रवेश आयसीएसई, सीबीएसईसारख्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून मराठी माध्यमांच्या शाळेत करून घेत आहेत. यामुळे या चळवळीला अधिक बळ मिळत असून मराठी शाळांना भविष्यात खरंच अच्छे दिन येतील, अशी आशा चळवळीचे प्रमुख प्रसाद गोखले यांनी व्यक्त केली.

आई नेटवर्क इंजिनीअर आणि वडील मोठ्या कंपनीत मॅनेजर पदावर काम करीत असतानाही प्रांजलच्या पालकांनी फेसबुक समूहाने प्रेरित होऊन सीबीएसई माध्यमाच्या इंग्रजी शाळेतून मराठी शाळेत प्रवेश घेतला आहे. आज ते प्रांजलच्या प्रगतीने खूप समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला काळाची गरज, भौतिक सुविधा, इंग्रजी भाषेची आवश्यकता या साऱ्याचा विचार करून प्रांजलच्या आई-बाबांनी तिला प्ले ग्रुपपासूनच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकले होते. मात्र प्रगती समाधानकारक असूनही प्रांजलला तिच्यातील इतर कलागुणांना वाव देण्यासाठी वेळ मिळत नव्हता, याची खंत गीता पाचकळे यांना सतावत होती. पुढे तिला पहिलीलाच ११ विषयांचा अभ्यासही आला. ताण वाढलाच, मात्र आठवड्यातून मराठीची एकाच तासिका शाळेत असल्याने तिचा मराठीशी असणारा लळा कमी होईल, अशी धास्ती प्रांजलच्या आई-बाबांना वाटू लागली. यामुळे घरातील वातावरणही बिघडत होते.

मराठी शाळा टिकवल्या पाहिजेत या चळवळीच्या फेसबुक समूहात प्रांजलचे आई-बाबा होतेच. त्याच माध्यमातून प्रेरित होऊन त्यांनी अखेर प्रांजलला मराठी शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला. आज प्रांजलची प्रगती पाहून ते दोघेही समाधानी असल्याचे ते अभिमानाने सांगतात. याचसोबत आपल्याला मातृभाषेचे महत्त्व कळले असून त्याचा प्रसार आपल्या सोबत असणाºया पालकांमध्येही करत आहेत. मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या मुलांची आकलनशक्ती व गुणवत्ता इतर भाषेच्या माध्यमातून शिक्षण घेतलेल्या मुलांपेक्षा अधिक चांगली असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.सेल्फी विथ माय मराठी शाळामराठी शाळांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी, यासाठी फेसबुकवर ‘सेल्फी विथ माय मराठी शाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे समूहाचे प्रमुख प्रसाद गोखले यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत ग्रुपचे सर्व सदस्य, पालकांना त्यांचे शिक्षण झालेली मराठी शाळा व त्यांची मुले शिकत असलेल्या मराठी शाळेसोबत सेल्फी काढून ग्रुपवर टाकण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :मराठीशाळामुंबई